सांगली : दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने आयोजित मिस अँड मिसेस कस्तुरी स्पर्धेत हर्षाली दीपक बेलवलकर ‘मिस कस्तुरी 2024’ ठरली, तर रोशनी मेहूल कदम ही ‘मिसेस कस्तुरी 2024’ची मानकरी ठरली. अत्यंत सन्मानाने, उत्साहाने, आनंदाने आणि अभिमानाने कस्तुरी स्पर्धेच्या विजेतेपदाचा क्राऊन या दोघींना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रचंड जल्लोष आणि रोषणाईने सारा माहौल दणाणून गेला.
‘दैनिक पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने आयोजित मिस अँड मिसेस कस्तुरी सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या मानकरी रविवारी झालेल्या कौतुक सोहळ्याने भारावून गेल्या. त्यांचे स्वप्न साक्षात सत्यात उतरले होते. दैनिक पुढारीचेसमूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्याहस्ते या दोन्ही विजेत्यांना 25 हजार रुपये बक्षिसासह क्राऊन प्रदान करण्यात आला. इतर बक्षिसांचेही वितरण यावेळी करण्यात आले.
सांगली शहरातीलच नाही, तर अगदी ग्रामीण भागातील मुली आणि महिलांचे जग बदलून टाकणार्या दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने आयोजित मिस अँड मिसेस कस्तुरी सौंदर्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले प्रचंड जल्लोषात साजरा झाला. कोण होणार मिस अँड मिसेस कस्तुरी सौंदर्य स्पर्धेची मानकरी? कोणाचे स्वप्न सत्यात उतरणार? याची उत्सुकता स्पर्धकांसह सार्या जिल्ह्याला लागून राहिली होती, तिचा गोड शेवट झाला.
हर्षाली बेलवलकर आणि रोशनी कदम यांनी दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने आयोजित मिस अँड मिसेस कस्तुरी सौंदर्य स्पर्धा जिंकली. यावेळी तनिष्क ज्वेलर्सचे संचालक प्रसाद कामत, जय कामत व वैभव पाटील, लियाड इन्स्टिट्युटचे साहिल शहा, द शिल्युएट डिझाईनच्या श्वेता दस्सानी, अस्मिता ब्युटी व सलून अकॅडमीच्या अस्मिता भाटे, नवराई ब्युटी स्टुडिओच्या पूनम अदिवेध, सलोनी ब्युटी केअरच्या संध्या साळे, नेत्रतज्ज्ञ डॉ. माधवी पटवर्धन, डॉ. निधी पटवर्धन, नेहा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यासह कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतील अभिनेते इंद्रनील कामत, सुपर्णा श्याम, अभिनेता व दिग्दर्शक आनंद काळे, दैनिक पुढारीचेसमूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, हेमंत भावसार यांनी या स्पर्धेत ज्युरी म्हणून जबाबदारी पार पाडली.
मिस अॅण्ड मिसेस कस्तुरी, सांगली सौंदर्य स्पर्धा हॉटेल ककूनच्या आकर्षक हॉलमध्ये पार पडली. सांगलीत पहिल्यांदाच आयोजिलेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. गृहिणी, वकील, डॉक्टर, शिक्षिका, नर्स, व्यावसायिका, अभियंत्या, संगणक तज्ज्ञ, उद्योजिका, शासकीय कर्मचारी महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. फक्त सांगली शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही महिला या स्पर्धेत उतरल्या होत्या. नावनोंदणीनंतर या मिस आणि मिसेस यांचे युनिव्हर्सल प्रोफेशनल वर्कशॉप, ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस घेण्यात आले. त्यानंतर मग सेमीफायनल आणि त्यातून फायनलसाठी निवड झाली. घरकाम-नोकरी-टप्पे यशस्वी पार पाडले.
दैनिक पुढारीचे नॅशनल मार्केटिंग हेड आनंद दत्त यांनी स्पर्धेच्या ज्युरी तसेच मान्यवर अतिथींचे स्वागत केले. विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांच्याहस्ते स्पंक डान्स इन्स्टिट्युटच्या नृत्य कलाकारांचा तसेच शमा नाटकातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
मिसेस कस्तुरी सांगली 2024 या सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या रोशनी कदम म्हणाल्या, दैनिक पुढारी व कस्तुरी क्लबमुळे मला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. खरे तर या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी कसलीच पूर्वतयारी नव्हती. सौंदर्य स्पर्धेचा कोणताही अनुभव नव्हता. स्टेज डेअरिंगही नव्हते. मात्र स्पर्धेत सहभाग घेतला आणि संयोजकांनी पूर्वतयारी करवून घेतली. माझ्यातील आत्मविश्वास जागवला. सौंदर्य व बुद्धिमत्तेची कसोटी पाहणारी ही स्पर्धा जिंकल्याने प्रचंड आनंद झाला आहे.
मिस कस्तुरी सांगलीचा मुकूट पटकावणारी हर्षाली दीपक बेलवलकर (हरिपूर) म्हणाली, हा क्षण अतिशय अविस्मरणीय आहे. दैनिक पुढारी व कस्तुरी क्लबमुळे हा क्षण अनुभवता आला. त्यामुळे पुढारीची अतिशय आभारी आहे. दैनिक पुढारीने युवती, महिलांना सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्यामुळे इथल्या युवती, महिलांना आपले सौंदर्य, टॅलेंट सिद्ध करता आले.