सांगली विधानसभा निवडणुकीत बुधगाव परिसरात भाजपला आघाडी मिळाली. बुधगावमध्ये काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र काँग्रेसमधील बंडखोरीचा भाजपला चांगलाच फायदा झाला. गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर प्रचंड दबाव होता. परंतु त्यांनी तो झुगारून दिल्याचे पाहायला मिळाले.
जयश्री पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दोन गट तयार झाले होते. पृथ्वीराज पाटील यांचा मागील पाच वर्षे गावात मोठा जनसंपर्क होता. त्यामुळे दुसर्या फळीतील कार्यकर्ते त्यांच्या नियमित संपर्कात होते. तसेच निवडणुकीपूर्वी देवदर्शन, यात्रेसाठी गावातील तेराशे महिलांना पाठविण्यात पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेतला होता. ग्रामपंचायत निवडणुकीवेळीही कार्यकर्त्यांना बळ दिले होते.
मात्र गावातील एक मोठा गट अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या मागे उभा राहिल्याने कार्यकर्ते विभागले. विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद सर्व प्रकार अजमावून काँग्रेसच्या प्रचारापासून रोखण्यात आले. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाल्याने, वाईटपणा नको म्हणून अनेकांनी दोन्हीकडेही प्रचारासाठी जाणे टाळले. काहीजणांनी दोन्हीकडून लाभ घेतला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकून सर्वांना प्रचारात आणले, पण प्रचार अपक्ष उमेदवाराचा आणि मतदान काँग्रेसला, असा प्रकार झाल्याचे निवडणूक निकालातून स्पष्टपणे दिसून येते.
दरम्यान, काँग्रेस-नवभारत आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचा फुटीर गट अशी सर्वांची मोट बांधून अपक्ष उमेदवाराची प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली. एवढे करूनही अपक्षाला केवळ दोन हजार एकशे पस्तीस मतांपर्यंत मजल मारून तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बड्या नेत्यांच्या दडपशाहीमुळे अनेक मतदान केंद्रांवर पक्षाला बूथवर बसायलासुद्धा कार्यकर्ते मिळू दिले नाहीत. इतका दबाव कार्यकर्त्यांवर आणला.
ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मागील दोन वर्षांच्या काळात कट्टर विरोधक असणारे अनेक नेते मतभेद बाजूला ठेवून एकत्र आणून अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांचा प्रचार करण्यात कारभार्यांना यश आले. मात्र काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या साथीने दबाव झुगारून पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी दुसर्या क्रमांकाची मते घेतली.
परंतु काँग्रेसमधील दुफळीमुळे भाजपाने नामी संधी साधली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना गावात मताधिक्य मिळाले, मात्र विकासकामांच्या जोरावर जनतेने सुधीर गाडगीळयांना कौल देत दीड हजार इतके मताधिक्य दिले.