

सांगली : पुढारी वृत्तसेवा
घरातील भांडणामुळे शनिवारी सकाळी सांगलीतून निघून गेलेली मुलगी अखेर गुजरातमध्ये सुखरूप सापडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलीला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी त्यासाठी मोठी मदत झाली.
शहरातील एका उपनगरातील 17 वर्षाची मुलगी शनिवारी सकाळी घरगुती भांडणातून घराबाहेर पडली. तिने थेट रेल्वेस्थानक गाठले. ती अजमेर एक्स्प्रेस गाडीत बसली. मुलगी बराच वेळ घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईकांकडेही चौकशी केली. पण तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर पालकांनी संजयनगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी ही मुलगी रेल्वेतून गुजरातच्या सीमेजवळ पोहोचली. रेल्वेत ती रडत असल्याचे पाहून एका प्रवाशाने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने सारा प्रकार त्या प्रवाशाला सांगितला. प्रवाशाने रेल्वेच्या आरपीएफ जवानांना हा प्रकार कळवला. जवानांनी मुलीला वापी स्थानकावर उतरवले. त्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत निरीक्षक कुरळे यांना मुलगी सुखरूप असल्याचे सांगितले. कुरळे यांनी पालकांना मुलगी सुरक्षित असल्याचे सांगत वापीला पाठविले. रविवारी पालकांनी तिला ताब्यात घेतले. पोलिस व आरसीएफच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरूप सापडल्याने नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.