बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
वाळवा तालुक्यात कृष्णाकाठावरील अनेक गावांमध्ये फटाक्यांची आतषबाजी, ढोल- ताशांचा गजर, तरुणाईचा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले.बोरगाव, ताकारी, नवेखेड, जुनेखेड, भवानीनगर, रेठरेहरणाक्ष, शिरटे, येडेमच्छिंद्र आदी भागात बँजो व बँडचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, उंट व घोडे सजविलेला रथ आदीतून गणपतीबाप्पा मोरयाऽऽचा जयघोष करत तरुणाईने मोठ्या उत्साही वातावरणात श्रींचे स्वागत केले.गणेशाच्या आगमनामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठा फुल्ल भरल्या होत्या, तर रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. व्यापारी वर्गात उत्साह असून, यंदा सर्वच वस्तूंना सजावट व खाद्यपदार्थ यांना चांगली मागणी आहे. तसेच मंडळांनी विविध उपक्रमांची तयारी केली आहे.
बोरगावमध्ये छोटी-मोठी अशी 30 ते 35 गणेश मंडळे असून, कृष्णाकाठावर शंभर ते सव्वाशेच्या आसपास सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. अनेक मंडळांनी समाजप्रबोधनात्मक देखावे तयार केले आहेत, तर काही मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केल्या आहेत. काही मंडळांनी सुमारे 100 महिलांना देवदर्शनासाठी 70 टक्के मंडळाचा खर्च, तर 30 टक्के त्या महिलांचा खर्च, असे उपक्रम राबविले आहेत. सर्वच मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.