

तासगाव, पुढारी वृतसेवा : तासगाव - सांगली रस्त्यावरील नागाव कवठे येथील एका पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या राजविजय या फर्निचरच्या दुकानात बुधवारी पहाटे तीन चोरट्यांनी रखवालदाराला बेदम मारहाण करून 56 हजारांचे साहित्य दरोडेखोरांनी लंपास केले. दरोडेखोरांच्या मारहाणीत रखवालदार आप्पासाहेब काशिनाथ पाटणे हे जखमी झाले. या प्रकरणी प्रशांत विजय पाटील (रा. कवठेएकंद) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी प्रशांत पाटील यांचे सांगली रस्त्यावर फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री ते दुकान बंद करून रखवालदार पाटणे यांच्याकडे दुकांनाच्या किल्ल्या देऊन घरी निघून गेले. पाटणे हे दुकानात झोपी गेले होते. पहाटे चोरट्यांनी मुख्य शटरचे दार कटावणीने उचकटले. याची चाहूल पाटणे यांना लागताच ते जागे झाले.
20 ते 30 वयातील तीन अज्ञात चोरट्यांनी रखवालदार पाटणे यांना मारहाण करून दुकानातील कॅश कोठे आहे, असे विचारून त्यांना धाक दाखविला. घाबरलेल्या पाटणे यांनी कॅश दुकानाचे मालक रोज घरी घेऊन जातात असे सांगितले. त्यावेळी दरोडेखोरांनी ड्रॉवरमधील चिल्लर व काही पैसे व रखावालदार पाटणे यांच्या खिशातील 300 रुपये काढून घेतले.
दुकानातील मिक्सर, कुकर, तांबे, पितळी, स्टील भांडी, गॅस शेगडी, थर्मास यासह इतर साहित्य व रोख रक्कम असे एकूण 56 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी पाटणे यांना दुकानात कोंडून बाहेरून कडी लावून गेले. घाबरलेल्या अवस्थेत पाटणे हे मदतीसाठी आतून हाका मारत होते. मात्र रस्त्यापासून दुकान काही अंतर आत असल्यामुळे पाटणे यांचा आवाज कोणाला येऊ शकला नाही.
दुकान मालक प्रशांत पाटील हे सकाळी शेताकडे जात असताना त्यांना दुकानातील काही साहित्य दुकानाच्या बाहेर पडल्याचे दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता दुकानांतून रखवालदार पाटणे हे मदत मागत असल्याचे दिसून आहे. चोरट्यांनी साहित्य चोरून नेल्याचे सांगितले. प्रशांत यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले व पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.