सांगली : पुढारी वृत्तसेवा
धरण व नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे सांगलीत पूर ओसरू लागला आहे. कृष्णा, वारणा नदीकाठी दिलासा मिळाला. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ३९ फूट २ इंच होती. एकोणीस तासांत पाणी एक फूट एक इंचाने उतरले.
दरम्यान, कृष्णा व वारणा नदीकाठावरील हजारो एकर शेती मात्र पाण्याखाली आहे. पाणी नदीपात्रात जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे. जिल्ह्यातील काही भाग वगळता पावसाने जवळपास उघडीप दिली आहे. त्यामुळे नदीकाठाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रविवारी कोयना धरणातून नदीपात्रात ३२ हजार २०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. दरम्यान, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणातून १७ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. रविवारी सकाळी विसर्ग कमी करून तो १२ हजार क्युसेक केला आहे.
साताऱ्यात अनेक घरांमध्ये घुसले पाणी सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यांत रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे कण्हेर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला.
दिवसभर जोरदार सरी कोसळल्या असून, अनेक ठिकाणी रस्ते खचले, छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या. पुलांचेही नुकसान झाले. साताऱ्यात समर्थ मंदिर परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले. चंद्रभागा नदीचा पूर ओसरला पंढरपूर: वीर धरणातून नीरा नदीत ५५ हजार ६४४ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आल्याने शनिवारी (दि. २७) चंद्रभागा नदीला महापूर आला होता.
मात्र, वीर धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने शनिवारी रात्रीपासून चंद्रभागेतील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली. रविवारी (दि. २८) पूर पूर्णतः ओसरला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चांदोली धरणातील विसर्ग 'जैसे थे' वारणावती :
चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर आज सकाळपासून मंदावला असला, तरी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग मात्र कायम आहे. त्यामुळे वारणाकाठी पूरस्थिती 'जैसे थे' आहे. धरणातून विसर्ग मात्र जवळपास १७ हजार क्युसेक आहे. धरणात आवक साडेनऊ हजार क्युसेक आहे. धरण ८५ टक्के भरले आहे

