Kolhapur News : पावनखिंडीतील दगडी पायरी मार्ग बनला निसरडा

पर्यटकांची पाठ, दगडी पायरी मार्गावर शैवाल
Pawankhind
पावनखिंडीतील दगडी पायरी मार्ग बनला निसरडा Pudhari Photo
Published on
Updated on

सुभाष पाटील

विशाळगड : अतिवृष्टी, सोसाट्याचा वादळी वारा, नदी, धरण जलमय असा एकीकडे निसर्गाचा रौद्र अवतार, तर दुसरीकडे विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण, असलेली संचारबंदी, पोलिसांचा बंदोबस्त, परिणामी  पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पाठ. पावनखिंड सध्या कोरोना काळ अनुभवतोय. निरव शांतता पर्यटकांभावी 'जय भवानी, जय शिवाजी'चा नारा गायब, दगडी पायरी मार्गावर शैवालाचे साम्राज्य, खिंड सुनी सुनी व धोकादायक बनली आहे.

 १३ जुलै रोजी बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी पावनखिंडीत साजरी झाली. १४ जुलैच्या विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या  हिंसक वळणामुळे गजापूरात घरांची जाळपोळ, वाहनांची तोडफोड झाली. घटना संपूर्ण राज्य, देश  नव्हे तर जगाचं लक्ष वेधून घेणारी ठरली. या घटनेला १५ दिवस उलटूनही येथील संचारबंदी उठलेली नाही. पांढरेपाणी, केंबुर्णेवाडी, गजापूर, विशाळगड पायथा येथे पोलीस बंदोबस्त आहे.

पर्यटकांची पाठ, दगडी पायरी मार्गावर शैवाल

शिवकाळात दि १२ व १३ जुलै १६६० रोजी ‘पन्हाळगड-पावनखिंड’ या मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ शेकडो मावळ्यांनी आपले रक्त या भूमीवर सांडले. अशा या दैदिप्यमान इतिहासाच्या घटनेला उजाळा देण्यासाठी तसेच प्राणार्पण करणाऱ्या शिवभक्त मावळ्यांना आणि ते लढलेल्या रणभूमीला अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षी 'पन्हाळगड-पावनखिंड' अशी धारकऱ्यांची साहसी पदभ्रमंती मोहीम हातात ढाल, तलवार, भाला तसेच शिवकालीन शस्त्रसोबत धारकरी या मार्गावर दरवर्षी मार्गस्थ होतात.

  यंदा मात्र विशाळगड प्रकरणामुळे पांढरेपाणी येथे नाकाबंदी व कडक पोलीस बंदोबस्त आहे. पर्यटक व पदभ्रमंती मोहीमवीरांना पांढरेपाणी येथे पावनखिंडीत जाण्यास मज्जाव होत आहे. मोहीम अर्धवट होत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून पर्यटकही खिंडीकडे फिरकलेले नाहीत. गेली १५ दिवस पर्यटन थांबल्याने खिंड सुनी-सुनी आहे. याचा परिणाम पर्यटकांसह व्यावसायिकांवर झाल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदी उठवून खिंडीला मोकळा श्वास द्यावा, अशी मागणी होत आहे.

दगडी पायरीमार्ग बनला निसरडा

पर्यटकांची होणारी गर्दी थांबली आहे. निसर्गरम्य ऐतिहासिक स्थळ पर्यटकाभावी सुना सुना आहे. दाट धुके, अतिवृष्टी, वादळी वारा, निसरड्या दगडी पायऱ्या, असा खडतर प्रवास पावनखिंडीत आहे. पर्यटकच नसल्याने दगडी पायरीमार्गावर शैवालाचे साम्राज्य पसरल्याने पायरी मार्ग निसरडा होऊन धोकादायक बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news