सांगली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा नदीचे पाणी दूषित केल्याप्रकरणी हुतात्मा, राजारामबापू आणि कृष्णा हे सहकारी साखर कारखाने व त्यांच्या डिस्टिलरींना चार कोटी 46 लाख 40 हजार रुपयांचा दंड झाला. त्याशिवाय महापालिकेलाही कोट्यवधी रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. हा दंड भरलाही जाईल, मात्र वाढत जाणार्या नदी प्रदूषणाच्या दुष्परिणामाचे काय? नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरूच राहणार का ? काही वर्षांपासून कृष्णा व वारणा या नद्याही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. नदीकाठावरील गावांतील सांडपाणी व कारखान्यांतील दूषित पाण्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांची साखळी उद्ध्वस्त होत आहे. नदीतील मासे वरचे वर मृत्युमुखी पडत आहेत. नदीच्या एकूण पाण्याच्या वापरापैकी 80 ते 90 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. औद्योगिक वापरासाठी व शहरांसाठी लागणारे पाणी उचलण्यासाठी अनेक उपसा योजना आहेत. या पाण्यातील काही भाग दूषित पदार्थ व क्षार यांच्यासह नदीच्या पाण्यात ठिकठिकाणच्या नाल्यांद्वारे मिसळतो व प्रदूषणास कारणीभूत ठरतो.
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णालयांची संख्या वाढली आहे. पूर्वीच्या काळी ठराविक काळातच रुग्णालयात रुग्णांची गर्दी असायची. आता बाराही महिने रुग्णालये गर्दीने फुल्ल असतात. दूषित पाण्यामुळे रुग्ण वाढल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
शुद्ध हवा, पाणी या मूलभूत गरजा आहेत. प्रदूषित पाणी, हवा याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात लोकप्रतिनिधींच्या संस्था, प्रशासन यांचाही सहभाग आहे. याबाबत अपवाद वगळता प्रमुख व्यक्ती, संस्था मौन बाळगून आहेत.
उद्या सांगलीतील रोटरी सभागृहात दुपारी चार वाजता कार्यशाळा आहे. त्यात नागरिकांनी सहभागी होऊन मत नोंदवावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी केले आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंचलाही निमंत्रित केल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी मंत्री मदन पाटील हयात असते तर त्यांनी सांगलीसाठी थेट चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी पुढाकार घेतला असता, असे नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी म्हटले आहे. वारणा उद्भव आणि थेट चांदोली धरणातून पाणी, या दोन्ही योजनांचे प्रस्ताव शासनाला पाठवू. शासन मंजूर करेल ती योजना स्वीकारू, अशी भूमिका साखळकर यांनी मांडली. ते म्हणाले, नदीकाठची गावे, शहरांचे सांडपाणी, कारखाने, उद्योगांचे सांडपाणी, जमिनीतून पाझरत नदीत येणारे रासायिक खतयुक्त पाणी, यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत.
सांगली व कुपवाडला वारणा नदीचे पाणी देण्याच्या वारणा उद्भव योजनेला झारीतील काही शुक्राचार्यांचा विरोध आहे. माजी मंत्री मदन पाटील यांनी ही योजना मंजूर करून आणली. या योजनेला त्यांचे नाव जोडले जाते. त्याचा पोटशूळ काहींना आहे. त्यातून थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याची योजना पुढे केली जात आहे. 1500 कोटींच्या चांदोली योजनेला बराच कालावधी लागेल आणि ती अशक्यही दिसत आहे, असे मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह पाटील, मदनभाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे, अमोल झांबरे, अविनाश जाधव उपस्थित होते. लेंगरे म्हणाले, वारणा उद्भव योजनेला बगल देण्यासाठी थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी पुढे केली जात आहे. त्यामागचा उद्देश वेगळाच दिसत आहे. त्यातून दोन्हीही योजना न होण्याचे पाप संबंधित स्वीकारणार आहेत काय?
लेंगरे म्हणाले, वारणा उद्भव योजनेस 270 कोटींची गरज आहे. 10 किलोमीटर पाईपलाईन, 12 जलकुंभ, गावठाणातील जुनी पाईपलाईन बदलून नवीन 400 कि.मी. पाईपलाईन करणे, 70 एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे याचा या योजनेत समावेश आहे. शासनाने ही योजना मंजूर केल्यास महापालिका हिस्सा 81 कोटी रुपये येईल. मात्र थेट चांदोली धरणातून पाणी आणायचे झाल्यास मुख्य पाईपलाईन 117 कि.मी. करावी लागेल. त्याचाच खर्च 1 हजार 53 कोटी रुपये होईल.