

आष्टा : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून पिकेही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आष्टा अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कारंदवाडी (हाळभाग), मर्दवाडी, शिगाव व शिरगाव येथील शेकडो कुटुंबांचे व जनावरांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे.
तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी वरील ठिकाणी राहणार्या नागरिकांचे व जनावरांचे स्थलांतर करण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. कारंदवाडी (कृष्णानगर हाळभाग) येथील पूरबाधीत 176 कुटुंबांपैकी 100 कुटुंबांचे तसेच 448 पैकी 81 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिरगाव येथील 165 कुटुंबांचे व 79 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मर्दवाडी येथील काही कुटुंबे व जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वारणा नदीकाठावरील शिगाव येथील 50 हून अधिक जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कारंदवाडी (कृष्णानगर हाळभाग) येथे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, मंडल अधिकारी लीना पाटील, तलाठी अभयकुमार उपाध्ये, सरपंच हिम्मत पाटील, उपसरपंच रूपाली सावंत, ग्रामसेविका ज्योती मोहोटकर, पोलिसपाटील अमित जाधव, कृष्णानगर पोलिसपाटील शीतल पाटील, किरण पाटील, ग्रा.पं. सदस्य सचिन लोंढे, संतोष वाडकर, बजरंग कामिरे यांनी भेट दिली.