सांगली : जिल्ह्यात ऊस दराचा ‘कंडका’ पडला

सांगली : जिल्ह्यात ऊस दराचा ‘कंडका’ पडला

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून ऊसदराबाबत सुरू असणार्‍या दराचा सोमवारी 'कंडका ' पडला. दत्त इंडिया (वसंतदादा) कारखान्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी मान्य केली. त्यामुळे कारखान्यासमोर रविवारपासून सुरू असणारे आंदोलन सोमवारी रात्री स्थगित करण्यात आले. बैठकीत गेल्या वर्षीचे 100 आणि यंदा 3 हजार 41 अधिक 100 रुपये देण्याचा फॉर्म्युला ठरला. या संदर्भातील पत्र प्रशासनाचे अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे घेऊन गेले. त्यांच्या सहीचे पत्र राजू शेट्टी यांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

ऊसदराचा कोल्हापूर पॅटर्न मान्य करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारपासून दत्त इंडिया कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आक्रमक कार्यकर्त्यांनी रविवारी कारखान्याचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न दोनवेळा केला. पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली होती. शनिवार, दि. 16 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याच्या अध्यक्षांची बैठक घेण्याचे पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. मात्र जोपर्यंत दत्त इंडिया दर जाहीर करीत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, असा पवित्रा शेट्टी यांनी घेतला होता. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते कारखान्याच्या गेटसमोर रात्रभर झोपले होते. ही बातमी सांगली आणि कोल्हापुरात सोमवारी पसरली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी कारखान्यासमोर सकाळपासून गर्दी केली होती.

स्वाभिमानीच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बैठक घेतली, मात्र बैठकीत तोडगा निघाला नव्हता. रात्री कारखान्याचे प्रशासन आणि संघटनेमध्ये प्रशासनाने पुन्हा मध्यस्थी केली.

कारखान्यासमोर पहिल्यांदाच आंदोलन

शेट्टी म्हणाले, आमच्याच कारखान्यावर सारखे आंदोलन का करता, असा प्रश्न कारखान्याच्यावतीने उपस्थित केला होता. मात्र आयुष्यात पहिल्यांदाच दत्त इंडिया कारखान्यासमोर आंदोलनासाठी आलो आहे. गेटसमोर जेवणाची पंगत कारखान्याच्या गेटसमोर मंडप उभारला होता. तसेच रात्री कार्यकर्त्यांची जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. रात्री गेटसमोर पंगत पडली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news