

मिरज, पुढारी वृत्तसेवा : एरवी संगीत वाद्यांची जुगलबंदी पाहणार्या व ऐकणार्या मिरजकरांना शुक्रवारी रात्री विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे व माजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यामधील शहरासाठी निधी देण्या-घेण्यावरून जुगलबंदी पाहायला मिळाली.
नगरसेवक निरंजन आवटी यांच्या प्रयत्नातून मिरजेतील लक्ष्मी मार्केट येथील महालक्ष्मी चौकाचे सुशोभीकरण झाले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजपचे नेते पालकमंत्री सुरेश खाडे हे प्रमुख पाहुणे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी पालकमंत्री जयंत पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी काँग्रेसचे नेते विशाल पाटील, जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री खाडे म्हणाले, सांगली व मिरज शहराच्या विकासासाठी आम्ही दोघेही एकत्र आहोत. आवटी हे आमच्या घराण्याचे आहेत, असे सांगून विशाल पाटील यांनी डायरेक्ट पार्सिलिटी केली आहे, असे पालकमंत्री म्हणाल्यानंतर एकच हशा पिकला.
मंत्री खाडे म्हणाले, जयंत पाटील यांनी सांगितले लक्ष्मीची मूर्ती आहे, त्यामुळे मिरजेला पैसे कधी कमी पडणार नाहीत. जयंत पाटील तुम्ही आमच्या मिरजनगरीत या कार्यक्रमाला आला त्याबद्दल तुमचे या नगरीचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे स्वागत करतो. सुरेश आवटी यांनी मागणी केल्याप्रमाणे स्वागत कमानी साठी दहा लाख रुपये निधी देतो, पण या व्यासपीठावर दोन कारखानदार बसले आहेत. त्यांनीही काहीतरी करावे, यावरही जोरदार हशा पिकला. सांगली मिरजेला निधी देताना कोणताही पक्षपात आम्ही केला नाही. 78 कोटी रुपयांचा प्रस्ताव आम्ही आजच पाठवणार आहोत, त्यातून चांगला विकास होईल. सांगली माझी चांगली, असे म्हणून सर्वजण एकत्र काम करूया.
माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, निरंजन आवटी यांना आम्ही संधी दिली आणि त्यांनी चांगले काम केले. मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट या इमारतीचे हेरिटेज वास्तू म्हणून सुशोभीकरण करावे. यासाठी मंत्री सुरेश खाडे यांनी मोठा निधी द्यावा. मिरजेच्या चौकामध्ये नव्याने महालक्ष्मीची मूर्ती उभी राहिली आहे त्यामुळे मिरजेला निधी पडणार नाही. अशी मिरजेला देणगी मिळाली आहे निधी देण्यासाठी सुरेश खाडे यांच्यावर जबाबदारी टाकणार्यांची संख्या वाढणार आहे. नगरसेवक संदीप आवटी यांनी संयोजन केले.
मिरा साहेब दर्ग्यासाठी अजित दादांकडून निधी घ्या…
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मीरा साहेब दर्ग्यासाठीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. अजित दादा पवार हे अर्थमंत्री असताना तो मंजूर झाला. आता भाजपनेच त्यांना अर्थमंत्री केले आहे. त्यामुळे तो निधी मंजूर करून घ्यावा.