

Housing Scheme Sand Supply Issue
विटा : खानापूर मतदार संघातील ६ हजार घरकुले बांधण्यासाठी शासनाने ५ ब्रास मोफत वाळू द्यावी, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली. नागपूर मध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार बाबर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.
आमदार सुहास बाबर म्हणाले की, खानापूर, आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघात शासनाच्या वतीने ६ हजार पेक्षा जास्त घरकुलांना मान्यता मिळाली आहे. या घरकुलांचे कामही सुरू आहे. शासनाच्या माध्यमातून या घरकुलांच्या बांधकामांला ५ ब्रास मोफत वाळू देण्याचे धोरण जाहीर झाले होते. परंतु आमच्या खानापूर तालुक्यामध्ये कोणताही वाळूचा डेपो आतापर्यंत देण्यात आलेला नाही. आणि आटपाडी तालुक्यामध्ये जे वाळूचे डेपो दिले आहेत. त्यांना स्थानिक लोकांचा मोठा विरोध आहे.
अशा परिस्थितीत या घरकुलांसाठी वाळू मिळाली नाही तर ती कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. महसूल मंत्र्यांनी ज्या ठिकाणी वाळूची उपलब्धता होत नाही. त्या ठिकाणी अन्य भागातून किंवा कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरला आपणा कडून परवानगी किंवा सवलत मिळत आहे. जिथे नदीची वाळू मिळत नाही. त्या ठिकाणच्या कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरनी घरकुलांना ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी. मात्र तसे करता येणे शक्य नसेल तर जिथे डेपो आहेत. त्या ठिकाणची वाळू मिळावी, अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली आहे.