

सांगली : पुढारी वृत्तसेवा
मिरज तालुक्यातील मालगाव येथील ग्रामविस्तार अधिकारी सुरेश जगताप यांच्याबाबत प्रशासन अन्यायकारक भूमिका घेत आहे, असा आरोप करीत ग्रामसेवकांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत मिरज पंचायत समितीसमोरील ग्रामसेवक संवर्गाच्या बदनामीचे सुरू असणारे आंदोलन हटविले जात नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा ग्रामसेवक युनियन आणि ग्रामसेवक संघ यांनी दिला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपासून ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक युनियन आणि ग्रामसेवक संघ यांची रविवारी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला सोमवारी सकाळी 11.30 वाजता मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्यावेळी संघटनेच्या कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गटविकास अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पंचायत समितीसमोर कर्मचारी आंदोलन करणार आहेत.
अनेक ग्रामसेवक प्रशासनाच्या ग्रुपमधून बाहेर पडले आहेत, मात्र काहीजण अजूनही बाहेर पडले नाहीत. मात्र संघटनेची एकजूट दाखविण्यासाठी सर्वांनीच गु्रपमधून बाहेर पडावे. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत न्याय न मिळाल्यास त्याची व्याप्ती राज्यभर वाढविण्यात येईल. त्यामुळे शंभर टक्के सर्वांनी काम बंद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोणीही जाणार नाही. ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयासमोर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील ग्रामसेवक एकत्रित येऊन त्याठिकाणी आंदोलन करणार आहेत.
ग्रामपंचायतीचे कार्यालय सुरू करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे कार्यालयातील कपाटाच्या चाव्या, शिक्के संघटना जमा करून घेणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रवीण देसाई यांच्यासह ग्रामसेवक युनियन आणि ग्रामसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेसाठी काही दाखले ग्रामपंचायतीमधून लागतात. तसेच विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये काम अडकू नये म्हणून निधी खर्चासाठी ग्रामपंचायतीमध्ये धामधूम सुरू आहे, मात्र ग्रामसेवकच उपस्थित नसल्याने अनेक विकासकामे थांबण्याची शक्यता आहे.