इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
शेअर बाजारात गुंतवण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत व माहेरकडील मालमत्तेचा हिस्सा द्यावा, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवाहिता अनुराधा अभिजित भोसले (वय 34, रा. कोल्हापूर, सध्या रा. इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.पती अभिजित भोसले (वय 38), सासू आरती भोसले (68), सासरे अशोक भोसले (70, तिघे रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), राजेंद्र दळवी (62 रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
सहा वर्षांपूर्वी अनुराधा यांचा विवाह अभिजित याच्याशी झाला होता. वर्षभर सासरच्या लोकांनी अनुराधा यांना चांगली वागणूक दिली. त्यानंतर ‘शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी माहेरकडून पैसे घेऊन ये, तुझ्या माहेरकडील जो तुझ्या वाट्याचा हिस्सा आहे, तो आम्हाला पाहिजे’, असे म्हणून पती अभिजित व सासू आरती हे अनुराधा यांना त्रास देऊ लागले. अनुराधा यांनी त्रासाबद्दल आईला सांगितले. त्यानंतर अनुराधा यांच्या आई, भाऊ यांनी वेळोवेळी 8 लाख रुपये सासरच्या लोकांना दिले.पैसे दिल्यानंतरही जादा पैसे घेऊन येण्यासाठी सासरकडील लोकांनी पुन्हा अनुराधा यांना शिवीगाळ, मारहाण सुरू केली. सासू आरती यांचा भाऊ राजेंद्र दळवी हा देखील अनुराधा यांना मानसिक त्रास देत होता. अनुराधा यांच्याकडील सोने, ठेवपावती सासरच्या लोकांनी काढून घेतली. या त्रासामुळे मार्च 2024 मध्ये अनुराधा माहेरी इस्लामपूर येथे आल्या. समुपदेशन केंद्रात चर्चा करूनसुद्धा त्यांनी नांदवले नाही, असे अनुराधा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.