पतीचे अनैतिक संबंध खपवून घ्यावे म्हणून विवाहितेचा छळ

सोलापूर : प्रतिनिधी

पतीचे दुसर्‍या महिलेबरोबर असलेले संबंंध खपवून घे म्हणून सविता कोळी या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सविताचा पती सोमनाथ कोळीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जुळे सोलापूर येथील रेणुकानगर शिक्षक सोसायटीमध्ये राहणारा सोमनाथ शिवशरण कोळी याचा विवाह आळंद तालुक्यातील हडलगी गावातील सविताबरोबर झाला होता. लग्नानंतर पतीने सविताला 1 वर्ष चांगले नांदविले. त्यानंतर जुलै 2019 पासून सोमनाथ याने त्याचे बाहेर दुसर्‍या महिलेबरोबर संबंध असल्याने सविताला त्रास देण्यास सुरूवात केली. उपाशी ठेवणे, घराबाहेर हाकलणे तसेच जर नांदावयाचे असल्यास भावाकडून घर खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये म्हणून सविताला त्रास दिला.

त्यानंतर सविताने भावाला सांगून पती सोमनाथ याला घर घेण्यासाठी 10 लाख रुपये दिले. पण सोमनाथ याचे दुसर्‍या महिलेबरोबर असलेले अनैतिक संबंध काही थांबले नाहीत. त्यामुळे सोमनाथ हा पत्नी सविताला पुन्हा त्रास देऊ लागला. सविताच्या भावाने दिलेल्या 10 लाख रुपयांतूनच सोमनाथ याने सध्या राहात असलेल्या रेणुकानगर शिक्षक सोसायटीतील घर विकत घेतले. त्यानंतर सोमनाथ हा पत्नी सवितास पुन्हा त्रास देऊ लागल्याने नातेवाईकांनी त्याला समजावून सांगूनसुद्धा तो ऐकत नव्हता तसेच सविताच्या सासरकडची मंडळीही सोमनाथ याचे कान भरत होती. ते ऐकून सोमनाथ याने पत्नी सविताला घरातून हाकलून दिले.

अशा आशयाची फिर्याद सविता सोमनाथ कोळी या विवाहितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून सविताचा पती सोमनाथ शिवशरण कोळी, सुभद्रा बाबू हिरूर, काळूबाई शिवशरण कोळी, दत्तात्रय शिवशरण कोळी, मलम्मा दत्तात्रय कोळी (सर्व रा. रेणुकानगर शिक्षक सोसायटी, जुळे सोलापूर) अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण करत आहेत. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news