Special 26 Incident | ‘स्पेशल 26’ गरिबी, बेकारी, बेरोजगारीचा परिपाक

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार झाल्याने पोलिसही चक्रावले.
Special 26 Incident
‘स्पेशल 26’ गरिबी, बेकारी, बेरोजगारीचा परिपाक(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

गरिबी, बेकारी, बेरोजगारी, पावला-पावलांवर अनुभवाला येणारी वशिलेबाजी, भ्रष्टाचार, झटपट श्रीमंतीचे स्वप्न आदी विविध कारणांमुळे वैफल्यग्रस्त झालेली युवा पिढी आजकाल मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहे. राज्यातील गुन्हेगारी क्षेत्राचा धांडोळा घेतला तर त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. सांगली जिल्ह्यात ‘स्पेशल 26’ स्टाईलने घातला गेलेला दरोडा, ही त्याचीच एक झलक आहे...

स्वप्निल पाटील, सांगली

सांगलीपासून 50 ते 55 किलोमीटरवर असणारा कवठेमहांकाळ तालुका... कवठेमहांकाळ शहरातच डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल. 14 सप्टेंबर रोजी एक कार रुग्णालयाच्या दारात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास येऊन थांबली. त्यातून चौघे उतरले. गेटवरच्या वॉचमनला ‘पेशंट घेऊन आलोय, डॉक्टर आमचे पाहुणे आहेत, त्यांना बोलवा’, असे सांगतात. त्यामुळे वॉचमन रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरच राहणार्‍या डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांना बोलविण्यासाठी जातो. त्यांच्या पाठोपाठ संबंधित चौघेही वर जातात.

डॉक्टरांनी दरवाजा उघडताच सर्वजण ‘आम्ही मुंबई आयकर म्हणून आलोय. तुमच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करायची आहे’, असे सांगतात. यावेळी चौघेजण आयकर विभागाचे ओळखपत्र आणि घर धुंडाळण्याचे सर्व वॉरंटस्ही दाखवतात. यावेळी डॉ. म्हेत्रे यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर तोतया अधिकार्‍यांनी वॉचमनसह म्हेेत्रे दाम्पत्याचे मोबाईल तातडीने काढून घेतले अन् संपूर्ण घर धुंडाळायला सुरुवात केली.

Special 26 Incident
Mumbai Police News | मुंबई पोलिसांना मिळणार डिजिटल स्मार्ट ओळखपत्र

आता ओळखपत्र अन् सर्च वॉरंटही असल्याने डॉक्टरही त्यांना तपासात सहकार्य करतात. डॉक्टर सर्व सोने आणि रोख रक्कम स्वतःहून तोतया अधिकार्‍यांना दाखवतात. इथेच तोतया अधिकार्‍यांचे अर्धे काम झाले. सुमारे एक किलो 400 ग्रॅम सोने आणि सुमारे 15 लाखांची रोकड मिळाल्याने तोतया अधिकार्‍यांनी बोगस धाड टाकून चांगलाच हात मारला होता.

इंजिनिअर असल्याचे सांगून मुख्य सूत्रधाराने इंग्लिशमध्ये जप्तीची नोटीस दिली व न्यायालयात येऊन म्हणणे मांडण्याच्या सूचना देत सर्व मुद्देमाल घेऊन निघाले. विशेष म्हणजे डॉक्टरही त्यांना सोडण्यासाठी रुग्णालयाच्या गेटपर्यंत आले. एका कारमध्ये बसून महिलेसह चौघे तोतया अधिकार्‍यांनी पलायन केले. अगदी शांत डोक्याने आले आणि शांततेने निघून गेले. काही वेळाने डॉ. म्हेत्रे यांचा मुलगा आला. त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी चौकशी केली असता आयकर विभागाने असा कोणताही छापाच टाकला नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.

या घटनेविषयी पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार झाल्याने पोलिसही चक्रावले. कवठेमहांकाळ पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षकही घटनास्थळी आले. अत्यंत चतुराईने ही धाड टाकलेली होती.

पोलिसांनी डॉक्टरांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली; तर संशयितांनी डीव्हीआरच काढून नेल्याचे समजले. कोणतेही धागेदोरे या मंडळींनी मागे ठेवले नव्हते.

Special 26 Incident
Pudhari Crime Diary : (अ) मानवी तस्करी!

गावातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात एक कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याकडे जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची त्याचा शोध घेतला तर ती कार सांगोला बसस्थानकापर्यंत गेल्याचे पोलिस तपासात समोर आले. चौघांनी पोलिसांना आपला ठावठिकाणा लागू नये यासाठी अन्य तीन साथीदारांना सांगोल्यामध्ये बोलावले होते. डॉक्टरांच्या घरात लूट केलेली रक्कम आणि सोन्याचे दागिने तिघांकडे देऊन चौघे एसटीने वेगवेगळ्या मार्गावर पसार झाले.

Special 26 Incident
Thane Crime : ठाण्यातील प्रेमप्रकरणात अडथळा ठरणार्‍या पतीला खाडीत फेकले

पोलिसांनी कारचा शोध सुरू केला तर त्याचा संबंध तोतया अधिकार्‍यांना केवळ सांगोलापर्यंत सोडण्याचा असल्याचे समोर आले. असे म्हणतात की, कोणी चोर कितीही हुशार असला तरी कोणता ना कोणता धागा मागे सोडतोच. हाच धागा पकडून पोलिसांचा शोध सुरू होता. दरम्यान, डॉक्टर म्हेत्रे यांच्या घरावर छापा टाकणार्‍या तोतया अधिकार्‍यांमध्ये सहभागी असणारी महिला पुण्यातील चिंचवडमधील असल्याची माहिती सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली. पथकाने तातडीने छापा टाकत तोतया महिला अधिकार्‍याला ताब्यात घेतले. ती एका नामांकित विमान कंपनीची कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब समोर आली. तिच्याकडे चौकशी केली असता ती पोपटासारखी बोलू लागली. सातजणांनी हा प्लॅन केला असून रोकड व दागिने कोल्हापुरातील हातकणंगलेमध्ये असल्याची कबुली तिने दिली. पथकाने तातडीने हातकणंगलेमधून दोघांना अटक करत छाप्यात लुटलेला एक कोटी 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर मुख्य सूत्रधारासह अन्य तोतया अधिकारीही पोलिसांना शरण आले.

दरम्यान, ‘स्पेशल 26’प्रमाणे सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा छापा पडला होता. त्यामुळे पोलिसांचे कसब पणाला लागले होते. छापा पडल्यापासून अवघ्या 60 तासांत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह छाप्यातील तोतया अधिकार्‍यांना बेड्या ठोकल्या.

Special 26 Incident
Pudhari Crime Diary : (अ) मानवी तस्करी!

उच्चशिक्षित आरोपी!

‘स्पेशल 26’ छाप्यात सहभाग घेतलेले सर्वजण उच्चशिक्षित आहेत. कोण इंजिनिअर, कोण विमान कंपनीत कर्मचारी, कोण बँकेत, तर कोणाची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. उच्च शिक्षित असणार्‍या सर्वांनी ‘स्पेशल 26’, ‘रेड’ यांसारखे हिंदी चित्रपट पाहिले अन् त्यांची टाळकी फिरली. ‘स्पेशल 26’सारखा आपणही छापा टाकू अन् रातोरात मालामाल होऊ या स्वप्नामागे ते धावले आणि तुरुंगात गेले. ‘स्पेशल 26’मधील तोतया अधिकार्‍यांचा सुगावा पोलिसांना लागला नाही. असाच आपलाही सुगावा पोलिसांना लागणार नाही, हा त्यांचा भ्रमाचा भोपळा पोलिसांनी जबरदस्त फोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news