

विजय लाळे
विटा : खानापुरात विद्यापीठ उपकेंद्र चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. याबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या इमारतीत उपकेंद्र सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळाली.
सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे कामकाज प्रत्यक्ष सुरू करण्याविषयी प्रशासकीय स्तरावरून हालचाली होत आहेत. गुरुवारी शिवाजी विद्यापीठाच्या समितीने खानापूर येथील नियोजित विद्यापीठ उपकेंद्रासाठी परिसरातील उपलब्ध इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. या समितीत अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, सिनेट सदस्य वैभव पाटील, प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी, प्रा. डॉ. रघुनाथ ढमकले, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. निवासराव वरेकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते.
खानापूर शहरातील संपतराव माने महाविद्यालय, रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, शोभादेवी पवार ज्युनिअर कॉलेज आणि अपेक्स पब्लिक स्कूल, खानापूर या चार ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. समितीने या चारही ठिकाणी असलेल्या इमारतीची सहज उपलब्धता आणि त्यांमधील सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीचा स्थळ अहवाल या समितीकडून शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनाला सादर करण्यात आला. त्यातून विद्यार्थी, पालक तसेच प्रशासन यांना सोयीस्कर म्हणून विजापूर ते गुहागर राज्य महामार्गावर विटा ते खानापूर रस्त्यालगत रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजची इमारत निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
याबाबत कुलगुरू आणि उच्च शिक्षण मंत्रालय स्तरावर निर्णय झाला आहे. मात्र अधिकृत घोषणा सोमवारी उच्च शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे खानापुरातील जाहीर कार्यक्रमात करणार आहेत.
खानापूर उपकेंद्रासाठीच्या नियोजित जागेपासून हे विद्यालय जवळ आहे. त्यापलीकडेच पाटबंधारे विभागाच्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या कार्यालयाच्या इमारतींची डागडुजी करून तसेच त्यालगत काही नवीन इमारतींची उभारणी करून हे विद्यापीठ उपकेंद्र कायमस्वरूपी सुरू होणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच अगदी या जुलैअखेरच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये सुरू होत आहे.