

तासगाव : पुढारी वृत्तसेवा: आजची लढाई ज्ञानाची आणि लेखणीची आहे. युवकांनी दगड व तलवारी उचलण्यापेक्षा शिव-शंभू चरित्रातून प्रेरणा घेऊन विश्ववंद्य अशा शिवरायांचे विचार अंगीकारावेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते, विचारवंत, शिव-फुले-शाहू-आंबेडकर आणि संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रसारक किरण माने यांचे दुबई येथे केले. दुबईत ११ व्या ज्ञानवर्धक शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Shiv Jayanti 2025)
माने म्हणाले की, शिवचरित्राच्या बदनामीचे षडयंत्र अलिकडच्या काळात वारंवार रचले जात आहे. विशिष्ट वर्ग त्यासाठी व्हॉट्सएप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्र आणि दिवस काम करीत आहे. याचेच फलित म्हणून पुण्यातील एक शिवद्रोही स्वयंघोषित कलाकार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले म्हणून समाजमाध्यमातून महाराजांची बदनामी करण्याचे धाडस करू शकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम भोसले आणि दीपक जोगदंड यांनी केले. कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवने यांनी पार पाडली. तसेच ब्लॉगर ज्योती सावंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रम हजारो शिवप्रेमी पर्यंत पोहचवला. शेवटी पंकज शारदा रमेश आवटे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष जीवने, राजेश पाटील, विक्रम भोसले, अभिजीत देशमुख, विजयसिंह शिंदे, संतोष सपकाळे, सुनंदा सपकाळे, मुकुंदराज पाटील, निखिल गणूचे, दीपक जोगदंड, जितू सपकाळे, जयंत रंगारी, अरहंत पाथर्डे, राहुल सणस, अभिजित इगावे, विनायक पवार, रामेश्वर कोहकड़े, अमोल कोचळे व पंकज आवटे यांनी अथक आणि विशेष परिश्रम घेतले.
तसेच राहुल घोरपडे, विजयेंद्र सुर्वे, संदीप कड, संतोष गायकवाड, अमोल डुबे-पाटील, विशाल जगताप, अनिल थोपटे-पाटील, महेश येसडे, आशिष जगताप, साईनाथ पेडणेकर, योगेश मैद-सोनार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात... या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील विविध देशात साजरी करण्यात येते. वाळवंटात वसलेले स्वर्ग म्हणजे दुबई. यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, दुबई आणि सत्यशोधक, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धक शिवजयंती सलग ११ व्या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन, जिजाऊ ब्रिगेड दुबई टीमच्या महिलांच्या जिजाऊ वंदना गायन आणि दुबई मधील पहिल्या महिलांच्या "स्वामिनी ढोल-ताशा पथकाच्या" जोरदार वादनाने झाली. राहुल सणस यांनी दिलेली शिव-शंभू गर्जना ऐकून उपस्थित सर्वजण भारावून गेले.
दुबई येथे सलग ११ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी - संयुक्त अरब अमिराती मधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, उम अल क्विन आणि रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.