Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्णPudhari

शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण; शिवनेरी गडावर विद्युत रोषणाई

शिवनेरी किल्ला पूर्ण विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे.
Published on

सुरेश वाणी

नारायणगाव: शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार,दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.

यंदाच्या वर्षी शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवासाठी येणाऱ्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवनेरी किल्ला पूर्ण विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. पर्यटन विभाग जिल्हा प्रशासनाकडून तीन दिवसांच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात सर्वत्र आकर्षक मंडप उभारण्यात आले असून त्यावर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पूर्ववेस ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत केलेली विद्युत रोषणाई शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

19 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री शिवनेरी किल्ल्यावर येणार असून बाल शिवाजी आणि जिजामातेच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत तर सहा वाजता शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध पैलूंचे दर्शन घडवणारी शोभायात्रा सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जुन्नर शहरातून काढण्यात येणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले.

दरम्यान शिवजयंती उत्सव निमित्त सोमवारपासून (दि. 17) कबड्डी व कुस्तीच्या स्पर्धा सुरू आहेत तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ.अमोल डुंबरे तसेच जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी जुन्नर शहर परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने तसेच शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या बाजूला भव्य वेस उभारण्यात आली आहे. बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी तैलचित्र त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये असलेली प्रेक्षणीय स्थळांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत. त्या ठिकाणी केलेली विद्युत रोषणाई शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. या चौकातील परिसर शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत असून अनेक शिवभक्त या ठिकाणी सेल्फी काढत आहेत विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी विसाव्याला थांबत आहेत.

शिवजयंती निमित्त शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य, संगीत रजनी, कुस्ती, कबड्डी स्पर्धा, मैदानी खेळ, फायर शो हे कार्यक्रम शिवजयंतीचे मुख्य आकर्षण असणार आहे. दोन दिवस बैलगाडा शर्यत सुरू असून या बैलगाडा शर्यतीला देखील तालुका व तालुक्याच्या बाहेरील बैलगाडा मालक व शौकिनांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

बुट्टे पाटील मैदानात विविध बचत गटांचे स्टॉल या ठिकाणी लावले असून ते देखील पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. यंदाच्या शिवजयंती उत्सवाची प्रशासनाच्या मदतीने पूर्ण तयारी झाली असून महाराष्ट्रातील शिवभक्तांनी दर्शनाला येताना काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच मंत्री महोदयांना कोणत्याही मागणीचे निवेदन देण्यात येऊ नये फक्त शिवजयंतीचा आनंद लुटा काही अडचण आली तर प्रशासनाला संपर्क करा असे आवाहन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news