

शिराळा शहर : संकटात धावून ये... म्हणत स्वरांजलीनं शिवमला राखी बांधली होती आणि आज हा जिगरबाज भाऊ बहिणीला वाचवण्यासाठी थेट बिबट्याला भिडला. शिवमनं बिबट्याची शेपटीच हातात धरून ठेवल्याने घाबरलेल्या बिबट्याने धूम ठोकली. तो परत फिरकलाच नाही.
शिवम आणि स्वरांजली दोघे सख्खे भाऊ-बहीण. परिस्थिती बेताची. गावातील हनुमान मंदिराजवळ बोळात त्यांचे साधे घर आहे. घराशेजारी गवताच्या गंज्या, जनावरे बांधायला खुंट्या आहेत. आसपास थोडे शेत असून त्या भागात ऊस पिकवला आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यावर शेजारच्या घरात जाण्यासाठी शिवम व स्वरांजली हातात हात धरून निघाले होते. यावेळी गवताच्या गंजीआड दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वरांजलीकडे झेप घेऊन तिच्या नरड्यास पकडले. यावेळी तिने ‘भावड्या...’ म्हणून मारलेली आर्त हाक शिवमला दहा हत्तींचे बळ देऊन गेली. लगेचच शिवमने धैर्याने बिबट्याचे शेपूट हातात पकडून ठेवले. तोपर्यंत घरचे लोक व ग्रामस्थांनी धाव घेतल्याने बिबट्याने स्वरांजलीला सोडून धूम ठोकली. यावेळी स्वरांजलीने स्वेटर व डोक्यास टोपी घातली होती.
यावेळी शिवम याने स्वरांजलीचा हात सुटल्यावर त्याने स्वरांजलीचा पाय पकडला. बिबट्याने तिच्या मानेला पकडले. मात्र डोक्यावर असणाऱ्या टोपीमुळे त्याचे दात पूर्ण आत जाऊ शकले नाहीत. याचवेळी त्यांची आई स्वप्नाली याही आल्या. शिवमच्या या धैर्यामुळे त्याच्या लाडक्या बहिणीचे प्राण वाचले. तिच्यावर शिराळ्यात उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात स्वरांजलीच्या हातावर, मानेवर, पाठीवर जखमा झाल्या आहेत. बिबट्याने बुधवारी केलेल्या या हल्ल्यामुळे हा परिसर पुन्हा हादरला आहे.उपवळे (ता. शिराळा) येथे बुधवारी रात्री बिबट्यानं हल्ला केला. त्याच्या जबड्यातून बहिणीला सुखरूप बाहेर काढणाऱ्या शिवम याचं शिराळा तालुक्यात कौतुक होत आहे.