

शिराळा : शिराळा शहरातील कासार गल्लीमधील निवृत्त शिक्षिकेच्या घराचे कुलूप काढून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 8 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. भरदुपारी ही चोरी झाल्याने शहरात घबराटीचे वातावरण आहे. हा चोरीचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. याबाबत निवृत्त शिक्षिका सुजाता शामराव उथळे यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांनी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत शिराळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुजाता उथळे या शुक्रवारी सकाळी 8 वाजता घराला कुलूप लावून किल्ली घराबाहेरील फरशीखाली ठेवून रेड येथे शेताकडे गेल्या होत्या. चोरट्याने या संधीचा फायदा घेऊन चोरी केली. सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर सुजाता उथळे यांना तिजोरीत दागिने व देवाच्या खोलीमधील कपाटातील रोख 22 हजार रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले.
त्यामध्ये 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 1 लाख 80 हजारांचे सोन्याचे गंठण, 70 हजारांची सोन्याची 12 ग्रॅमची माळ, 1 लाख 32 हजार रुपये किमतीचा 22 ग्रॅमचा सोन्याचा गोफ, 60 हजारांची 1 तोळ्याची कर्णफुले, 18 हजार रुपयांची सोन्याची रिंग, 18 हजार रुपयांचे सोन्याचे टॉप, 21 हजार रुपयांची कर्णफुले, 18 हजार रुपयांची अंगठी, 12 हजारांच्या रिंगा, हिर्याची रिंग, सोन्याची रिंग, 40 हजार रुपयांचे चांदीचे निरांजन, ताट, करंडक, लक्ष्मीची नाणी व देवघरातील 22 हजाराची रोकड चोरट्याने चोरून नेली.
पोलिस निरीक्षक सिध्देश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलिस चोरीचा तपास करत आहेत. शिराळा येथील चोरीच्या तपासासाठी एलसीबी व शिराळा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू आहे.
सिद्धेश्वर जंगम, पोलिस निरीक्षक, शिराळा पोलिस ठाणे