Shirala Nag Panchami | 23 वर्षांनी शिराळ्यात जिवंत नागांची पंचमी

21 नागांच्या दर्शनासाठी गर्दी; रात्री उशिरापर्यंत मिरवणुका
Shirala Nag Panchami |
शिराळा : असे जिवंत नाग पंचमीदिवशी लोकांना दाखविण्यात आले. Pudhari Photo
Published on
Updated on

शिराळा : अधूनमधून कोसळणार्‍या पावसाच्या सरी आणि ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात येथील प्रसिद्ध नागपंचमी जिवंत नागांसह तब्बल 23 वर्षांनी मंगळवारी उत्साहात झाली. समाज प्रबोधनाच्या काही अटी आणि शर्तींवर केंद्र सरकारने जिवंत नाग पकडण्यास परवानगी दिली असल्याने शिराळकर भक्त, नागराज मंडळे आनंदी होते. यावर्षी 21 जिवंत नाग पकडले होते. या नागांच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती.

अंबामाता मंदिरात वन खात्याच्या देखरेखीखाली जिवंत नागांविषयी समाज प्रबोधन करण्यात आले. नागराज मंडळांत उत्साह होता. कच्चाड युवा शक्तीमार्फत नाथपंथीय साधू अघोरी नृत्य या यात्रेचे आकर्षण ठरले. 2002 पासून जिवंत नाग पकडण्यास न्यायालयाने बंदी घातलेली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदैवत अंबामातेच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक वर्षे जिवंत नागांच्या पूजेची परंपरा जोपासणार्‍या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत जिवंत नागांऐवजी नाग प्रतिमेची व घरोघरी मातीच्या नागांची पूजा केली. यंदा कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी दोन दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. पहाटेपासून महिला, नाग मंडळे ग्रामदैवत अंबामातेच्या मंदिरात येऊन दर्शन घेऊन पुन्हा मिरवणूक मार्गाकडे जात होती. नाग मंडळांनी डीजे, बेंजो व पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढली.

2002 पर्यंत जिवंत नागांची पूजा करायला मिळायची. येणार्‍या पर्यटकांना नागांचे दर्शन व्हायचे. मात्र, न्यायालयाने बंदी घातल्यामुळे जिवंत नागांची प्रथा बंद करावी लागली होती, यंदा ती पुन्हा सुरू झाली. त्यासाठी आमदार सत्यजित देशमुख यांनी प्रयत्न केले.सकाळी दहा वाजता महाजनवाड्यात मानाच्या पालखीचे पूजन करून पालखी काढण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. यात्रेला सकाळी गर्दी नव्हती; मात्र दुपारी 12 पासून तुफान गर्दी झाली होती. यात्रेसाठी दोन दिवसांपासूनच महसूल, वन विभाग व पोलिस पथकांची नियुक्ती होती.

अनेक ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावले होते. शिराळा एस.टी. आगाराने 38 एस.टी. बसगाड्यांची सोय केली होती. विश्वासराव नाईक महाविद्यालय, साई संस्कृती, वाकुर्डे मार्ग या ठिकाणी बसथांबे होते. आरोग्य विभागाने सात पथके ठेवली होती. सर्पदंशावरील 1,104 लसी उपलब्ध होत्या. पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वीज वितरणने पथके नेमली होती. मिरवणूक मार्गावर नगरपंचायतीच्या प्रशासनाने स्वच्छता व औषध फवारणी, येणार्‍या भाविकांसाठी 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी नळाची व्यवस्था केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news