Shaktipeeth Expressway : ’शक्तीपीठ’ वरून खानापूर-आटपाडीत राजकारण पेटले ; आमदार बाबर यांच्या 'दुटप्पी' भूमिकेवर काँग्रेसचा हल्लाबोल

महामार्गाची सध्याची अलाइनमेंट रद्द करून ती पुन्हा जुन्या अलाइनमेंटनुसार करण्याची आमदार बाबर यांची मागणी
Shaktipeeth Highway Protest
Shaktipeeth Highway Project (Pudhari File Photo)
Published on
Updated on

विटा : शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित अलाइनमेंट वरून खानापूर-आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता राजकीय वादंग निर्माण झाला आहे. आ. बाबर यांनी महामार्गाची सध्याची अलाइनमेंट रद्द करून ती पुन्हा जुन्या अलाइनमेंटनुसार करण्याची मागणी केली होती. यावर काँग्रेसचे नेते तथा विटा शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गजानन सुतार यांनी आक्रमक पवित्रा घेत, आ. बाबर यांना उघड पत्र लिहून त्यांच्या या मागणीवर सडकून टीका केली आहे.

नेमका वाद काय?

दोन दिवसांपूर्वी आ. सुहास बाबर यांनी विधानसभा अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गाबाबत भाष्य करताना, सध्याच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगत ती रद्द करून जुन्या अलाइनमेंटनुसारच मार्ग करावा, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर मतदारसंघातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आमदार बाबर यांच्या या भूमिकेचा समाचार घेताना गजानन सुतार यांनी पत्राद्वारे थेट सवाल उपस्थित केला आहे. सुतार पत्रात म्हणतात की, "जर सध्याची अलाइनमेंट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे, तर संपूर्ण शक्तीपीठ महामार्गच रद्द करण्याची ठाम मागणी आपण का केली नाही? एका भागातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या भागातील शेतकऱ्यांचा बळी देण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून आपणास शोभत नाही."

एका अलाइनमेंटमधील शेतकरी आपले आणि दुसऱ्या अलाइनमेंटमधील शेतकरी परके आहेत का? दुसऱ्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान करून कोणता न्याय साध्य होणार आहे? तुम्ही सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करता, केवळ एका भागाचे नव्हे असे म्हणत सुतार यांनी म्हटले आहे की, "पहिली अलाइनमेंट शासकीय स्तरावर आधीच रद्द झालेली आहे आणि सातारा-सांगलीतील लोकप्रतिनिधींच्या हरकतीनंतरच दुसरी अलाइनमेंट जाहीर झाली आहे. हे आपणास ठाऊक असतानाही, केवळ स्थानिक रोशाला सामोरे जावे लागू नये म्हणून तुम्ही जुन्या अलाइनमेंटची मागणी करून जनतेची दिशाभूल करत आहात. हा तुमचा केविलवाणा प्रयत्न साऱ्या जनतेला कळून चुकला आहे.

शेतकऱ्यांना विभागण्याऐवजी, संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाबाबतच स्पष्ट आणि ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी सुतार यांनी केली आहे. एका शेतकऱ्यावरील अन्याय थांबवण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, ही भूमिका घेत सुतार यांनी आ. बाबर यांच्या 'दुटप्पी' भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान,आता यावर आमदार सुहास बाबर यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news