

भिलवडी : शाळेतून आईसोबत घरी परतणार्या एका सात वर्षांच्या शाळकरी मुलाचा डंपरखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. 18 जुलै रोजी सरळीच्या नवीन पुलाजवळ घडली. राज वैभव पवार (वय 7, रा. भिलवडी) असे मृत बालकाचे नाव आहे. अपघातात मुलाची आईही जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिलवडी शिक्षण संस्थेच्या खासगी प्राथमिक शाळेत पहिलीत शिकणारा राज सकाळी सव्वाअकरा वाजता शाळा सुटल्यानंतर आई विद्याराणी यांच्यासोबत रस्त्याच्या कडेने चालत घराकडे येत होता. त्यावेळी माळवाडीहून भिलवडीकडे वेगाने जाणार्या डंपरने (एमएच 10 ए डब्ल्यू 9729) सरळी-मौलानानगरवरील नवीन पुलाजवळ दोघांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघातात राज गंभीर जखमी झाला, तर त्याची आई विद्याराणी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. अपघात घडल्यानंतर चालक डंपर घटनास्थळी सोडून पळून गेला. गावातील शशिकांत जरंडे आणि खंडेराव भिसे यांनी तातडीने राज याला उपचारासाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्याच्या डोक्याला, चेहर्याला आणि उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद भिलवडी पोलिस ठाण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.