

इस्लामपूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल ऋत्विक आप्पासाहेब कोळी (वय 22, रा. कारंदवाडी, ता. वाळवा) याला न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.
बलात्काराची ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. बलात्कारानंतर मुलीला अपत्य झाले होते. पीडिता नववीत शिकत होती. तिची ऋत्विक याच्याशी मैत्री झालेली. त्यांच्यात संबंध निर्माण झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्याने 4 एप्रिल 2023 रोजी तिचे अपहरण केले. ते दोघे विजापूर येथे राहत होते. ती गर्भवती राहिली. त्याने तिचे बनावट आधार कार्ड तयार केले. 10 जून 2024 रोजी पीडितेला मुलगा झाला. तिने त्याच्याविरोधात आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्याच्याविरोधात भा.दं.वि. कलम 363, 376, 376 2 एन, 376 3 468ए 471 सह बालकांचे लैंगिक अपराधातून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12, 5 जे, 2, 5 एलप्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच्याविरोधात येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात फिर्यादी मुलगी, पंच, साक्षीदार , वैद्यकीय अधिकारी, जन्म-मृत्यू निबंधक व तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक संतोष यादव आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. ऋत्विकला 20 वर्षांची शिक्षा व 13 हजार रुपये दंड सुनावला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. रणजित एस. पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी उत्तम शिंदे, पोलिस हवालदार चंद्रशेखर बकरे यांनी सरकारी पक्षास मदत केली.