

सांगली : आमदार जयंत पाटील यांनी आगीशी खेळ खेळू नये. आयुष्यभर तुम्ही विश्वासघातकी राजकारण केले आहे. मी तुम्हाला कधीच नेता मानले नाही आणि यापुढेही ती वेळ येणार नाही. तुम्ही बालिश वक्तव्य करून पोरकट राजकारण खेळू नका. तुम्हाला जर खुमखुमी असेल, भांडायचे असेल तर तुमच्या सगळ्या काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. ते काढायची वेळ आणू नका, असे प्रत्त्युत्तर माजी खासदार संजय पाटील यांनी आ. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर दिले.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आ. जयंत पाटील यांनी, ‘संजय पाटील यांनी भाजपमध्ये जाऊन आम्हाला मदत केली’, असे वक्तव्य केले होते. त्यावर संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाटील म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचे राजकारण अडचणीत यावे, अशी वक्तव्य केली आहेत. तुमचा काळा इतिहास काढायला लावू नका. राजकीय साटेलोटे करण्यासाठी तुम्ही काय-काय केले, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही विश्वासघातचे राजकारण किती केले, ते बाहेर काढायला लावू नका. संजय पाटील संघर्षातून पुढे आला आहे. लोकसभेत पराभव झाला, विधानसभेत पराभव झाला, पण राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मी कुणाचे उंबरठे झिजविले नाहीत.
अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली म्हणून आम्हाला अध्यक्षपद द्या, अशी मागणी मी केली होती. आदल्या दिवशी त्यांनी सांगितले की अध्यक्षपद देता येत नाही. आमची बैठकही झाली, पण त्याठिकाणी काही घडामोडी समजल्यानंतर मी ठरवलं की, अशा विश्वासघातकी माणसांसोबत राहण्यापेक्षा बाहेर पडायचे. त्यानुसार बाहेर पडलो. माझ्यासोबत पाच माणसे होती, पण महिलांना भीती दाखवली. मी एकटाच त्या जमावातून आलो. माझे धाडस जयंत पाटील यांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी ‘बालिश’ आणि ‘गोंधळ निर्माण करणारे’ असे प्रकार थांबवावेत.
महिला सदस्यांवर दबाव टाकला
जिल्हा परिषद निवड प्रक्रियेतील घडामोडींवर बोलताना संजय पाटील म्हणाले, निवडणुकीदरम्यान लाईट बंद करणे, महिला सदस्यांवर दबाव टाकणे, सदस्यांचे मोबाईल फोन काढून घेणे, असे प्रकार घडले. या घटनांची चौकशी व्हावी.
महायुतीमध्येच राहणार
माजी खासदार पाटील यांना यापुढे तुमची भूमिका काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की भाजपमध्ये जाणार? असे विचारले असता ते म्हणाले, मी महायुतीमध्ये आहे. सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून विकासासाठी माझा प्रयत्न असणार आहे.