माझं नशीब उलटंपालटं करणारा पैदा व्हायचाय! संजय पाटील यांचा विश्वजित यांच्यावर हल्लाबोल

माझं नशीब उलटंपालटं करणारा पैदा व्हायचाय! संजय पाटील यांचा विश्वजित यांच्यावर हल्लाबोल

सांगली; पुढारी वृत्तसेवा : 'माझं नशीब उलटंपालटं करणारा राजकीय पुढारी अजून पैदा व्हायचा आहे,' असा हल्लाबोल भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. या लोकसभा निवडणुकीत बेरंग करणार्‍या सर्वांचा व्याजासह हिशेब चुकता करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सांगलीत कोण निवडून येणार आहे, मी कोणत्या पाटलांच्या मागे उभा आहे, हे येत्या चार जून रोजी कळेल, असे वक्तव्य माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले होते. त्यांचे नाव न घेता खासदार पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांचा उल्लेख माजी मंत्री आणि आमदार असा केला.

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून भाषण करणार्‍यांनी मतदानाच्या अगोदर गोपनीय बैठक घेऊन खिशातून पाकिट काढून दाखवत मतदान कोणाला करायचे आहे, हे सांगितले. हिंमत असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावे की त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे काम केले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी विश्वासघात केला आहे. त्यांना मी मदत केली आहे, आता त्यांनी काय-काय केले ते मला कळाले आहे, असे ते म्हणाले.

लोकसभेच्या या निवडणुकीत सापडतोय म्हटल्यावर माझ्यावर हत्यार काढण्याचा प्रयत्न झाला. काहींनी शब्द दिला, पण पाळला नाही. पक्षातीलच काहींनी विरोधात काम केले. कोण कोणाला कोठे भेटले, कोणाशी चर्चा झाली, कोणाच्या फार्महाऊसवर एकत्र आलेे, हे सर्व माहिती आहे. ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले, त्यांच्याशी जशास तसे वागण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. व्याजासह हिशेब चुकता केला जाईल, त्यांचे उट्टे काढले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. मी तुमच्यासोबत, पक्षासोबत असल्याचे काहीजण भासवत होते. मखलाशी करत होते. पण या निवडणुकीने दूध का दूध आणि पाणी का पाणी केले, असेही ते म्हणाले.

विलासराव, अजितरावांबाबत नंतर बोलू

विलासराव जगताप यांना बरेच दिवस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हेकेखोरपणा सोडला नाही. अजितराव घोरपडे यांची भूमिका काय असणार हे माहिती होते, त्यामुळे त्यांना भेटलो नाही. त्यांच्याबाबत 4 जूननंतर बोलू, असेही खासदार पाटील म्हणाले.

लाखापेक्षा जास्त मताधिक्य

मला दर्प नाही. घमेंड नाही. मस्तीही नाही. काही लोक हळवे असतात. काळजी करतात. त्यांनी अजिबात काळजी करू नये, मी तिसर्‍यांदा खासदार होणार आहे. काहीजणांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा विशेष परिणाम होणार नाही. थोडे मताधिक्य कमी होईल. एक लाखापेक्षा जास्त मताने माझा विजय निश्चित आहे, असे संजय पाटील यांनी सांगितले.

पृथ्वीराज देशमुख यांच्याबाबत चार जूननंतर बोलू

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सणकून टीका केली होती. भाजप नेत्यांच्या उपस्थितीतही पुन्हा हल्लाबोल केला होता. त्यांच्या नावाचा उल्लेख खासदार पाटील यांनी 'भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष' असा केला. ते म्हणाले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्षांनी काय केले. यापूर्वीच्या निवडणुकीतही ते काय करत होते, याबाबत 4 जूननंतर बोलू.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, वेळेला आला

इस्लामपूरहून तुम्हाला मदत झाल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, वेळेला आला. दरम्यान, संजय पाटील यांच्या उत्तराने दबक्या आवाजातील चर्चेला बळकटी मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news