

पलूस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पदवीधरांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध असून पदवीधरांचे प्रश्न कायमचे सोडवण्याची क्षमता महायुती सरकारमध्ये आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांच्यासारख्या उच्चशिक्षित व अनुभवी नेतृत्वामुळे पदवीधरांच्या प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखाना परिसरात आयोजित महायुतीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांच्या प्रचारार्थ पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. पलूस-कडेगाव तालुक्यातून डॉ. जाधव यांना उच्चांकी मताधिक्य देऊन भाजपचा विजय सुकर करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले, डॉ. स्मिताताई जाधव या शिक्षणतज्ज्ञ व यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी, वित्तीय व्यवस्थापनात एम.बी.ए. आणि शिक्षण विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. सध्या त्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व सचिव म्हणून कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे.
मेळाव्यास आ. अरुण लाड, भाजप प्रदेश सचिव शरद लाड, शेखर इनामदार, राजाराम गरुड, नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, ॲड. विशाल मोहिते, विलास काळेबाग, प्रदीप कदम, शिवाजी मगर-पाटील, सागर नलावडे, संदीप गायकवाड, विकास सूर्यवंशी, मिलिंद पाटील, प्रसाद भस्मे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.