आटपाडी : पुढारी वृत्तसेवा
एका अल्पवयीन मुलीवर चारचाकी गाडीत बलात्कार केल्याप्रकरणी मुख्य संशयित संग्राम देशमुखला आटपाडी पोलिसांच्या पथकाने काल रात्री अकलूजमध्ये अटक केली. ऑगस्टमध्ये पीडित मुलीला संशयित संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्रा लेंगरे हिने जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवले. पीडितेच्या कुटुंबाला व बहिणीला मारून टाकेन, अशी धमकी देत तिच्यावर आटपाडी तलावावर चारचाकी गाडीत बलात्कार करण्यात आला होता.
याबाबत पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर सोमवारी गुन्हा दाखल झाला. मंगळवारी परिचारिका सुमित्रा लेंगरे हिला अटक करण्यात आली. तर पोलिस निरीक्षक विनय बहिर, उपनिरीक्षक रमेश जाधव, हेड कॉन्स्टेबल सोमनाथ पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद रोडे, नाईक नितीन मोरे यांच्या पथकाने काल रात्री संग्राम देशमुखला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे अटक केली.
आज त्याला आटपाडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे आटपाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संग्राम देशमुख अकलूज येथे अनेक वर्षे वास्तव्यास होता. त्यामुळे अकलूज येथे त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? याची तपासणी केली जात आहे. त्याच्याकडून कुणावर अन्याय झाला असल्यास तत्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी केले आहे.