तासगाव : सोमवारी दुपारी तासगाव येथील जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहून गेलेले दांपत्य हे सातारा जिल्ह्यातील पिपोडे (बुद्रुक) येथील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नदीपात्रात दुसर्या दिवशी सायंकाळ झाली तरी, शोध घेऊनही ते सापडले नाहीत. एनडीआरएफचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
दत्तात्रय उतम पवार व रेखा दत्तात्रय पवार अशी त्या दांपत्याची नावे आहेत. ते त्यांच्या गावी पोहोचले नसल्याने तेच वाहून गेले असावेत अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. हे दांपत्य तासगाव येथील नातेवाईकाच्या निधनानंतर असणार्या विधीसाठी आले होते. येथील विधीचा कार्यक्रम संपवून ते परत जात असताना ही दुर्घटना घडली आहे.
येरळा नदीपुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. सतर्कता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल रहदारीसाठी बंद ठेवला होता. मात्र या दांपत्याने हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही दुचाकीसह नदीत वाहून गेले. याची माहिती समजल्यानंतर तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकास पाचारण केले. यावेळी तातडीने एनडीआरएफ पथक पोहोचले व तपास सुरू केला. मात्र, मंगळवारी उशिरापर्यंत त्या दोघा पती-पत्नीचा शोध लागला नव्हता. सध्या नदीतील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शोधमोहिमेस अडथळा निर्माण होत आहे. त्या दांपत्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे एनडीआरएफचे मेजर संदीप पवार यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार अतुल पाटोळे यांनी शोधकार्य करणार्या एनडीआरएफ पथकाच्या संपर्कात राहून आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच तलाठी पतंग माने यांनी सलग दोन दिवस शोध पथकासमवेत थांबून मदतकार्य केले.