

सांगली : शहराच्या कचरा व्यवस्थापनात शाश्वत आणि पर्यावरणपूरक पावले उचलत महापालिकेने समडोळी रोड येथील घनकचरा प्रकल्पस्थळी 10 टन प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक बायो-मिथेनेशन प्लान्ट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी उपलब्ध झाल्यानंतर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ओल्या कचऱ्यावर आधारित ऊर्जा निर्मिती व सेंद्रिय खत उत्पादन यामुळे शहराच्या कचरा व्यवस्थापनात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
हा प्लान्ट ॲनएरोबिक डाइजेशन या वैज्ञानिक प्रक्रियेवर आधारित आहे. दररोज आवश्यक असणारे सुमारे 10 टन फीडस्टॉक शहरातील हॉटेल-रेस्टॉरंट, आठवडा बाजार, भाजी बाजार, फळे बाजार आणि विवाह-सामाजिक कार्यक्रम स्थळांमधून संकलित होत आहे. कचऱ्याच्या प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या मिथेनयुक्त बायोगॅसचा गॅस होल्डरमध्ये साठा करून त्याचा विद्युत निर्मितीसाठी वापर करण्यात येणार आहे.
दररोज 450 ते 500 घनमीटर बायोगॅस निर्मितीची क्षमता असून त्याद्वारे महापालिकेच्या प्रकल्पस्थळी वीज उपलब्ध होईल. यामुळे कचरा प्रक्रिया केंद्राचा वीजभार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कचऱ्याच्या प्रक्रियेनंतर उरलेला जैविक गाळ शंभर टक्के नैसर्गिक व सेंद्रिय खत म्हणून तयार होणार आहे. जमिनीची सुपीकता वाढवणारा हा खत प्रकार कृषी क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहे.
हा प्रकल्प सुरू करण्यासाठी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनासह पर्यावरण अभियंता अजित गुजराथी यांनी तांत्रिक रचना, अंमलबजावणी याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. महापालिकेच्या या उपक्रमामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर कचरा व्यवस्थापनाचे ‘कचरा ते ऊर्जा’ मॉडेल प्रभावीपणे राबवणाऱ्या देशातील अग्रगण्य शहरांच्या यादीत स्थान मिळवणार आहे.