सांगली : कडेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान

सांगली : कडेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान
Published on
Updated on

कडेगाव (सांगली), पुढारी वृत्तसेवा : कडेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार ( दि 18) रोजी मतदान झाले. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 31.31 टक्के मतदान पार पडले. यामध्ये 93 हजार 441 मतदारापैकी 29 हजार 258 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष 16374 तर 12884 महिला मतदारांचा समावेश आहे.

रविवारी सकाळी साडेसातपासून मतदानाला प्रारंभ झाला. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही. परंतु सकाळी 9 नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 13.16 टक्के मतदान झाले.यामध्ये 12254 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. तर 11.30 पर्यंत 31.31 टक्के मतदारांनी मतदान केले. दरम्यान, यावेळी प्रशासनाने गर्दीत मतदारांना जास्त वेळ थांबावे लागू नये याची दक्षता घेतली होती.

तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुक होत असून, तालुक्यातील विहापुर व येवलेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. शाळगाव व उपाळे मायणी ग्रामपंचायतने निवडणुकीवर गायरान जमीन संदर्भांत बहिष्कार घातला आहे. आज 39 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले.

या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी कदम गट विरुद्ध देशमुख गट अर्थात काँग्रेस विरुद्ध भाजपा यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशीब आजमावत सात ग्रामपंचायतमध्ये आपले सरपंच पदासाठी उमेदवार उभे केले आहे. तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्या झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस व भाजपा पक्षाचे दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.

सध्या बहुतांश ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व आहे.त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे तर भाजप सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येथे मोठी चुरस वाढली आहे. मतदान सुरू झाल्यापासून गावोगावी प्रत्येक पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. प्रत्येक कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्नशील दिसत होते. तर मतदानावेळी मतदारांतही मोठा उत्साह दिसून आला. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व भाजप लढतीमुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. यामुळे मतदान केंद्रासमोर दोन्ही बाजुने मतदान खेचण्यासाठी चढाओढ दिसत होती.

दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क  

माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम , भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. शिवाजीराव कदम यांनी आपल्या सोनसळ ( ता. कडेगाव ) येथे तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कडेपुर येथे आपला मतदानाचा हक्क बाजवला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news