Vithalapur Panchayat Samiti
Dilip Hegde Victory Pudhari

Sangli Election Results | अश्रू, संघर्ष आणि स्वाभिमान! विठलापूर गणात तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचा विजय

Dilip Hegde Victory | शिवसेना शिंदे गटाने दाखवलेला विश्वास आणि मतदारांनी दिलेला कौल यामुळे हा निकाल इतिहासात नोंदला
Published on

Vithalapur Panchayat Samiti

आटपाडी : कधी टिंगल, कधी उपेक्षा, तर कधी समाजाच्या कटाक्षांना सामोरे जात केलेला प्रवास… आणि अखेर जनतेच्या मतांनी सन्मानित झालेला क्षण! विठलापूर पंचायत समिती गणात तृतीयपंथी दिलीप अण्णा हेगडे यांनी २४५४ मतांच्या भक्कम आघाडीने विजय मिळवत संघर्षाचे सोने केले. हा निकाल पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरला.

दिघंची जिल्हा परिषद गटातील या लढतीत केवळ राजकीय समीकरण नव्हते; तर तो स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि स्वीकाराचा प्रश्न होता. शिवसेना शिंदे गटाने दाखवलेला विश्वास आणि मतदारांनी दिलेला कौल यामुळे हा निकाल इतिहासात नोंदला गेला.

Vithalapur Panchayat Samiti
Sangli ZP Election : भाजपला झटका; राष्ट्रवादी (श. प.) ची मुसंडी

यापूर्वी आवळाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड होऊन दिलीप हेगडे यांनी समाजातील भिंतींना तडा दिला होता. आता पंचायत समिती सदस्य म्हणून निवड होताच, त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू हे केवळ वैयक्तिक आनंदाचे नव्हते; तर अनेक वर्षांच्या वेदना आणि संघर्षाचे प्रतीक होते.

या विजयामागे सुहास बाबर यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचा ठाम पाठिंबा महत्त्वाचा ठरला. “संधी दिलीत, म्हणून आज समाजासमोर उभा राहू शकलो,” असे सांगताना हेगडे यांचा आवाज भरून आला.

Vithalapur Panchayat Samiti
Satara Sangli Solapur ZP Result 2026: सोलापुरात भाजप, साताऱ्यात अजित पवार गटाची सरशी; सांगली कोणाकडे? पाहा संपूर्ण निकाल

“ही माझी नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीची जिद्द आहे, ज्यांना समाजाने कधी कमी लेखले,” असे भावनिक उद्गार काढत त्यांनी विठलापूर गणातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली.

पुरोगामी महाराष्ट्रातील पहिला तृतीयपंथी उपसरपंच आणि आता पंचायत समिती सदस्य हा केवळ राजकीय विजय नाही; तो समाजाच्या बदलत्या मनाचा, समतेच्या नव्या पहाटेचा क्षण आहे. ढोल-ताशांच्या गजरात साजऱ्या झालेल्या या जल्लोषात, एका संघर्षमय आयुष्याला मिळालेला सन्मान दुमदुमत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news