Sangli ZP Election : भाजपला झटका; राष्ट्रवादी (श. प.) ची मुसंडी

जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची? ः सत्ता स्थापन करण्यासाठी कोण आणि कसे एकत्र येणार याची उत्सुकता
Sangli ZP Election : भाजपला झटका; राष्ट्रवादी (श. प.) ची मुसंडी
Published on
Updated on

सांगली ः जिल्हा परिषदेत कोणताही एक पक्ष बहुमताजवळ पोहोचू शकलेला नाही. जिल्हा परिषदेच्या 61 पैकी 18 जागा जिंकून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपला 16, शिवसेनेला 7, राष्ट्रवादीस 6, काँग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत; तर शिवसेना (उ. बा. ठा.), जनसुराज्य शक्ती आणि रयत क्रांती संघटनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. जिल्ह्यात एकही अपक्ष उमेदवार विजयी झाला नाही, मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोण कोणाचा हात हातात घेणार आणि बहुमताचे ‌‘टायमिंग‌’ साधणार, याबाबत उत्सुकता आहे. सध्या तरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे त्रांगडे निर्माण झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या इतिहासात 2017 मध्ये पहिल्यांदाच 26 जागांवर यश संपादन करून भाजपाने सत्ता काबीज केली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपला जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस, शिवसेनेलाही चांगले यश मिळाले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचले; असे असले तरी, त्यांना बहुमतासाठी एक जागा कमी पडत आहे. एकनाथ शिंदे शिवसेना किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) यांपैकी एका पक्षाने आघाडीला पाठिंबा दिला, तर सत्तेचा मार्ग मोकळा होईल. दुसऱ्या बाजूला भाजपला सत्तेत येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य आणि रयत क्रांती या पक्षांची मदत भासणार आहे. या पक्षांनी साथ दिली, तरच भाजप युतीला सत्ता मिळू शकते. अन्यथा सद्यस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळविणे सोपे दिसते. पंचायत समित्यांवर सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), काँग्रेस, शिवसेनेस प्रत्येकी दोन, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षास प्रत्येकी एका पंचायत समितीत सत्ता मिळाली आहे. मिरजेत भाजपला सेनेची साथ लागणार आहे, तर शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत सत्ता मिळवली.

खानापूरमध्ये शिवसेना बाजीगर

खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या सर्वच म्हणजे आठही जागांवर शिवसेनेचा भगवा पडकला आहे. भाजपाला एकाही जागेवर यश मिळाले नाही. आमदार सुहास बाबर यांनी आपला गट शाबूत ठेवला आहे. भाजपला या तालुक्यात मोठा धक्का बसला आहे.

कडेगावमध्ये काँग्रेस सुसाट; भाजपला धक्का

कडेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या आठ गणांपैकी केवळ एका जागेवर भाजपला यश मिळाले, तर उर्वरित सातही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. या तालुक्यात आमदार विश्वजित कदम यांचा करिष्मा कायम राहिला आहे. माजी आमदार, भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे.

जत तालुक्यात भाजपच ‌‘नंबर वन‌’

जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 9 जागांपैकी 8 जागा भाजपला, तर 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या एकाही जागेवर काँग्रेसला यश मिळाले नाही. पंचायत समितीच्या 18 पैकी 12 जागा भाजपला मिळाल्या. राष्ट्रवादीला 2, तर काँग्रेसला 4 जागांवर यश मिळाले. जत पंचायत समितीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. या तालुक्यात भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्षांनी आघाडी केली होती, मात्र त्यांना यश आले नाही.

वाळव्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे वर्चस्व

वाळवा तालुक्यात विरोधकांनी मोट बांधून आमदार जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. मात्र या तालुक्यात 11 गटापैकी 7 जागांवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने यश मिळविले आहे. येथे भाजपला 1, रयत क्रांती संघटनेस 1, शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाला 1, तर शिवसेनेलाही 1 जागा मिळाली आहे. पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा विजय झाला आहे. महायुतीला 8 जागा मिळाल्या आहेत.

शिराळा तालुक्यात भाजपचा मोठा पराभव

शिराळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार गटापैकी एकाही जागेवर भाजपला यश मिळाले नाही. या तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 2, राष्ट्रवादीस 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला एका जागेवर यश मिळाले. पंचायत समितीच्या आठ जागांपैकी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 3, राष्ट्रवादीस 3 आणि भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. शिराळा पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची शक्यता आहे.

मिरज तालुक्यात भाजपची आघाडी

मिरज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 11 जागांपैकी 6 जागा भाजपला मिळाल्या. येथे काँग्रेसला 2, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षास 2, राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळाले. पंचायत समितीच्या 22 जागांपैकी भाजपला 10, काँग्रेसला 3, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 4, राष्ट्रवादीस 3, तर शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. मिरज पंचायत समितीवर भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी (श. प.) पक्षाचा करिष्मा

कवठेमहांकाळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 3, तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 5 जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला, तर 3 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची सत्ता आली आहे.

आटपाडीत शिवसेनेचा भगवा

आटपाडी तालुक्यातील 4 गटापैकी शिवसेनेस 2, तर राष्ट्रवादी व भाजपाला प्रत्येकी 1 जागा

मिळाली आहे. पंचायत समितीच्या 8 जागांपैकी शिवसेनेस 5, तर भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. आटपाडी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फ डकला आहे. पलूस तालुक्यात काँग्रेसच नंबर वन पलूस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चारही मतदारसंघ काँग्रेसने ताब्यात घेतले आहेत. पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 7 ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला, तर एका जागेवर भाजपला यश मिळाले आहे. पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

तासगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी आघाडीवर

तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 जागांपैकी 4 जागांवर राष्ट्रवादी (शरदचंद्र

पवार) पक्षाला यश मिळाले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

पंचायत समितीच्या 12 गणांपैकी 8 ठिकाणी राष्ट्रवादी, 1 जागा भाजपला आणि राष्ट्रवादी

(शरदचंद्र पवार) पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. या तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादींनी आघाडी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news