

Yogesh Kadam on Minister Slams Officials
विटा : “आढावा बैठक म्हणजे झालेल्या कामांची आणि अपूर्ण कामांची यादी वाचून दाखवणे नव्हे, तर अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना मांडणे अपेक्षित असते,” अशा शब्दांत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले.
खानापूर मतदारसंघातील महसूल व ग्रामविकास विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक विटा येथे मंत्री कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या बैठकीस आमदार सुहास बाबर, सभापती सुवर्णा भोसले, जिल्हा परिषद सदस्या शीतल बाबर, नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, उपसभापती सुहास शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत खानापूरचे गटविकास अधिकारी संताजी पाटील, तहसीलदार योगेश टोंपे, आटपाडीचे गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार आणि तहसीलदार शीतल बंडगर यांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला. सुरुवातीला घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत वाळूअभावी अडचणी येत असल्याचे सांगितल्यावर मंत्री कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “संपूर्ण तालुक्यात वाळू उपलब्ध नाही का?” असा सवाल त्यांनी करत, घरकुलांची कामे थांबवू नयेत आणि पर्यायी व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
यानंतर आटपाडी तालुक्याचा आढावा घेताना सादर झालेली अत्यल्प प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीतील कमतरता पाहून मंत्री कदम संतप्त झाले. बैठकीला ४२ पैकी केवळ ५ ग्रामविकास अधिकारी उपस्थित असल्याचे समोर येताच त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “मला काही काम नाही म्हणून इथे आलो आहे का?”, “काम करायचे नसेल तर तसे सांगा,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच, “मी मुंबईला गेल्यानंतरही या कामांचा फॉलोअप घेणार,” असा इशाराही दिला. आटपाडीच्या गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी थेट मंचावरून खाली बसण्यास सांगितले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत असल्याचे मंत्री कदम यांनी आमदार सुहास बाबर यांना सांगितले. त्यावर बाबर यांनी गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी केली.
दरम्यान, खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील महसूल विभागाच्या काही कामांबाबत समाधान व्यक्त करतानाच मंत्री कदम यांनी शासकीय योजनांबाबत अधिकाऱ्यांमध्ये असलेली अनास्था आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा यावरही बोट ठेवले. घरकुलांची अपूर्ण कामे, रॉयल्टी वसुलीतील उदासीनता यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महसूल वाढीसाठी प्रयत्न वाढवावेत, तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विटा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच विविध गावांचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.