

विटा : विट्यातील एमडी ड्रग कारखाना प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. आता तर यात थेट सावकारी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. मेफेड्रॉन (एमडी) ड्रगचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केला. या घटनेला आता आठवडा उलटून गेला. एका महिलेसह एकूण सात जण याप्रकरणी अटकेत आहेत. त्यांना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मात्र, अद्यापही या ड्रग फॅक्टरीचा मालक नेमका कोण ? यामागे कुणी स्थानिक बिल्डर, उद्योगपती किंवा राजकिय शक्ती आहे का ? याबाबत पोलि सांकडून कसून तपास सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी ड्रग्जचे साठे सापडत होते. त्यावर कारवाई होऊन संबंधित प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पुन्हा चार आठ दिवसांत शांत होत असे. कारण, ज्या लोकांवर कारवाई केली जायची, असे लोक जामिनावर बाहेर सुटलेले असायचे आणि त्यांचे खटले महिनोन्महिने, वर्षोनवर्ष चालायचे. त्यामुळे अशा प्रकारांमधील संशयित ड्रग पेडलर अर्थात विकणारी मंडळी राजरोसपणे वावरत असायची.
या कारखान्याचा मालक असलेल्या गोकुळा विठ्ठल पाटील या महिलेला अटक केली आहे. मात्र, हा कारखाना मुळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वेगळ्याच मालकाच्या नावाने नोंदणीकृत आहे. ज्या नावाने प्लॉट नंबर ४३ वरच्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज हा खिळे, मोळे आणि पुठ्ठे बनवण्याचा कारखाना आहे. त्या मूळ माल काने कारखाना सुरू करण्यासाठी विट्यातील काही जणांकडून काही लाख रक्कम व्याजाने घेतली होती. ती रक्कम ठरलेल्या वेळेत परत करू शकला नाही. त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेला कारखाना संबंधित खासगी सावकारांच्या ताब्यात गेला. अशी चर्चा लोकांत सुरू आहे.