

शीतल पाटील, सांगली :
उडता पंजाब, उडता गोवा याच धर्तीवर उडती सांगली... अशी सांगली जिल्ह्याची भयावह ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्ह्यात 30 कोटीचे एमडी (मेफॅड्रॉन) ड्रग्ज जप्त केले अन् सांगली जिल्हा पुन्हा एमडी ड्रग्ज निर्मितीच्या केंद्रस्थानी आला. या भलत्याच धंद्यातील आका कोण, या चर्चेला उधाण आलेले दिसत आहे...
विट्याजवळच्या कार्वेतील औद्योगिक वसाहतीचा परिसर... अनेक कारखाने बंद पडलेले... काही जागांवर अजून उद्योगच न उभारलेला... रस्त्यालगतच एक पत्र्याचे शेड... तेही दोन वर्षापासून बंद झालेले... आधी तेथे खिळे, मोळे तयार व्हायचे... नोव्हेंबरमध्ये कारखाना भाडेतत्त्वावर दिला... आणि महिन्याभरातच कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारखान्यातून कारखान्यातून थोडेथोडके नव्हे तर तब्बल 30 कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त केले. ड्रग्ज तयार करण्यासाठीची रसायने ताब्यात घेतली अन् सांगली जिल्हा पुन्हा एमडी ड्रग्ज निर्मितीच्या केंद्रस्थानी आला. ड्रग्ज तयार करणार्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी, या ड्रगकांडाचा खरा आका कोण, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. सांगली जिल्ह्यात नशेचा हा गोरखधंदा जोरात सुरू आहे, असेच म्हणावे लागते.
संथ वाहणार्या कृष्णामाईच्या कुशीत विसावलेला सांगली जिल्हा कधीकाळी सहकार, नाट्यपंढरी म्हणून नावाजलेला. तितकाच राजकीयदृष्ट्या संवेदनशीलही. राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची खाती सांभाळलेला जिल्हा. अधुनमधून गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढत असतात, पण पोलिसांकडून या टोळ्यांना चापही बसलेला. पण आजकाल या जिल्ह्याची ओळख ड्रग्ज डेस्टिनेशन अशी होवू लागली आहे.
जिल्ह्यात गांजाची तस्करी नेहमीचीच. अगदी आता नशेचे इंजेक्शन, गोळ्या आणि एमडी ड्रग्जची निर्मितीही जिल्ह्यात होऊ लागलीय. नव्या वर्षाची सुरुवातच अमली पदार्थावरील कारवाईने झाली. मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्याने नशेसाठी वापरण्यात येत असलेली दीड हजार इंजेक्शन्स व गोळ्या जप्त केल्या. इंजेक्शन्स, गोळ्यांची तस्करी करणार्या आशफाक बशीर पटवेगार (वय 50, रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली), रोहित अशोक कागवाडे (44, रा. शामरावनगर, आकांक्षा मेडिकलच्या वरील बाजूस, सांगली) आणि ओंकार रवींद्र मुळे (24, रा. गव्हर्मेंट कॉलनी, विजय कॉलनी, विश्रामबाग, सांगली) या तिघांच्या मुसक्या आवळल्या. नशेच्या इंजेक्शनचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच मेफॅड्रॉन (एमडी) ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच सापडला.
विटा (ता. खानापूर) जवळील कार्वे औद्योगिक वसाहतीत ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू होता. यामागचे गुजरात, मुंबई कनेक्शन उघड झाले. यापूर्वीही जिल्ह्यात एमडी ड्रग्जचा साठा सापडला होता. तेव्हाही मुंबई, पुणे कनेक्शन उघड झाले होते. कार्वे औद्योगिक वसाहतीत बंद पडलेला कारखाना रहुदीप धानजी बोरिचा (वय 41, उत्तीयादरा कोसंबा, जि. सुरत, गुजरात), सुलेमान जोहर शेख (32, मुंबई) आणि बलराज अमर कातारी (24, सध्या रा. साळशिंगे रोड, विटा) या तिघांनी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला. महिना 30 हजार भाडे ठरले. त्यांनी अत्तर निर्मितीचा बनाव केला, पण प्रत्यक्षात एमडी ड्रग्ज बनविले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील सागर टिंगरे, नागेश खरात यांना 27 जानेवारी रोजी कार्वे एमआयडीसीत एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार यांना माहिती दिली. शिंदे यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना कळवले. सायंकाळीच एलसीबीचे पथक वॉरं व तपासणी आदेशासह कार्वे औद्योगिक वसाहतीत पोहोचले. कारखाना परिसरात सापळा लावला असता संशयित बलराज कातारी मोटारीतून ड्रग्ज घेऊन कारखान्यातून बाहेर पडत होता. त्याला पकडले.
पथकाने कारखान्यावर छापा टाकला. आतमध्ये रासायनिक द्रव्यांचा तीव्र वास येत होता. डोळे चरचरत होते, श्वास घेण्यासही त्रास होत होता. तरीही पथकाने रसायने व तयार चौदा किलो एमडी जप्त करीत तिघांना अटक केली. यातील सुलेमान शेख हा ड्रग्ज तस्करी प्रकरणात आधी कारागृहात होता. मुंबई एटीएसने त्याला पकडले होते. गुजरातचा बोरिचा हा केमिस्ट. कातारीवर ड्रग्ज पुणे, मुंबईला पोहोच करण्याची जबाबदारी. तिघांच्या चौकशीत आणखी तीन नावे समोर आली. जितेेंद्र परमार, अब्दुल रज्जाक अब्दुलकादीर शेख व सरदार पाटील या तिघांना अटक केली. सरदार पाटील हा सुलेमानचा साथीदार. मुंबई एटीएसच्या छाप्यावेळीही त्याचे नाव निष्पन्न झालेले. तो सांगली जिल्ह्यातील शेणे (ता. वाळवा) गावचा.
मुंबई, पुण्यात मागणी, सांगलीत निर्मिती एमडी ड्रग्जला पुणे, मुंबईत मोठी मागणी आहे. महानगरात ड्रग्जचा गोरखधंदा करणार्या तस्करांनी सांगलीला लक्ष्य केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ड्रग्ज निर्मिती करून पुणे, मुंबईला पाठविले जात असल्याचे यापूर्वीच्या गुन्ह्यातून उघड झाले होते. खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव या दुष्काळी पट्ट्यात कारखाने उभे करायचे, तेथे ड्रग्ज तयार करायचे आणि ते महानगरात पाठवायचे, अशी साखळीच कार्यरत होती. या तालुक्यात ड्रग्ज बनविल्यास नागरिकांचे, पोलिसांचे फारसे लक्ष जाणार नाही, असा तस्करांचा कयास. मात्र सांगली पोलिसांनी तो खोटा ठरविला.
सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या चौदा किलो एमडीची किंमत 29 कोटी आहे. एका ग्रॅमची किंमत 3 ते 4 हजार रुपये आहे. मुंबई, पुण्यात एमडीची तस्करी केली जाते. म्याव-म्याव, कॅट, कॉटर, चावल, चॉकलेट अशा विविध नावाने ड्रग्जची विक्री होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
ड्रग्जच्या धंद्यात सांगली जिल्ह्यातील तरुण अडकलेेत. गांजा व नशेच्या गोळ्या विकणार्या टोळ्या जिल्ह्यात चौका-चौकात मिळून येतात. काही वर्षापूर्वी एमडी ड्रग्ज तस्करीचा शिरकाव जिल्ह्यात झाला. कुपवाडमधील आयुब मकानदार याच्याकडून पुणे पोलिसांनी फेब्रुवारी 2024 मध्ये 300 कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याने मिठाच्या पोत्यात ड्रग्ज लपविले होते. त्यानंतर इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे मुंबई पोलिसांनी छापा टाकून एमडी ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. तेथून 245 कोटीचे एमडी जप्त केले. तासगाव तालुक्यातील एका गावातून ड्रग्जसाठी लागणारी रसायने सांगली पोलिसांनी जप्त केली होती. कोल्हापूर पोलिसांनी सांगलीच्या अथर्व सरवदे, संतोष पुकळे या दोघांना गोव्यातून एमडी ड्रग्ज सांगलीकडे घेऊन जाताना ताब्यात घेतले होते. जिल्ह्यातील अनेक तरुण ड्रग्ज निर्मिती व तस्करीत गुंतले आहेत.