

Vita Khanapur Farmers Protest
विटा : शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही शेतकऱ्यावर जबरदस्ती केली जाणार नाही, सध्या केवळ प्राथमिक सर्वेक्षण सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नागेवाडीतील शेतकरी तयार नसल्याचे मंगळवारी (दि.९) दिसून आले. "आम्हाला आश्वासन नको, तर प्रकल्प रद्द झाल्याचा निर्णय हवा," अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच रक्ताने सह्या करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले.
खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माहुली, चिखलहोळ आणि भाग्यनगर परिसरात शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गाचे ड्रोनच्या साहाय्याने मोजमाप करण्यास प्रशासनाने सुरुवात केली. प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोंपे, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि पोलिस बंदोबस्त संबंधित ठिकाणी उपस्थित होते.
ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळताच विविध गावांतील शेतकरी घटनास्थळी जमा झाले. काहींनी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील तसेच ॲड. दीपक लाड यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान, नागेवाडीत मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अद्याप दूर असून सध्या फक्त प्राथमिक सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. कोणत्या गटातील किती क्षेत्र बाधित होणार याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "आम्हीही शेतकरी कुटुंबातीलच आहोत. कोणावरही अन्याय किंवा जबरदस्ती होणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवू," असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
मात्र, शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला. "गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सर्वेक्षणासाठी कोणी येते का, यासाठी गावागावांत गस्त घालावी लागत आहे. आम्ही रक्ताने सह्या करू, पण सुपीक जमीन महामार्गासाठी देणार नाही," असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
नागेवाडीप्रमाणेच माहुली, भाग्यनगर आणि चिखलहोळ येथेही शेतकरी व मोजणी पथकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी सर्वेक्षणाचे काम तात्पुरते थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली. नागेवाडी परिसरात तणाव वाढल्याने महसूल विभागाने अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोनद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षणाला काही काळासाठी अडथळा निर्माण झाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.
इकडे नागेवाडी शिवारातील वातावरण अतिशय तणावग्रस्त बनले असून महसूल अधिकाऱ्यांनी आणखी पोलिसांची जागा कुमक मागवली आहे. तोपर्यंत तरी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाची ड्रोन सर्वेक्षण मोजणी काही काळापुरती हाणून पाडली. परंतु, महसूल विभागाच्या आणि ड्रोन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची जादा कुमक मागवून संतप्त शेतकऱ्यांना आणखी चिथाण्याचा प्रयत्न केला. वातावरण आणखी तणावपूर्ण बनले त्यातच काही शेतकऱ्यांनी रॉकेल आणि पेट्रोलचे कॅन आणले. त्यामुळे वातावरण आणखीच तणावपूर्ण बनले.
एका बाजूला गाड्यांमध्ये मोजणीचे साहित्य घेऊन आलेले अधिकारी आणि पोलीस तर दुसऱ्या बाजूला संतप्त शेतकरी, याचवेळी ॲड. दीपक लाड यांनी शेतकऱ्याच्या हातातून पेट्रोल चा कॅन ओढून घेतला आणि क्षणार्धात स्वतः च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि घोषणा देत अधिकाऱ्यांच्या गाडीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. तर इतर शेतकऱ्यांनी हातात दगड घेऊन गाडीकडे भिरकावण्यास सुरुवात केली.
त्यानंतर मात्र प्रसंगाचे गांभीर्य ओळखून काही अधिकाऱ्यांनी थेट काढता पाय घेतला तर काहींनी मोजणी काही काळ थांबवत असल्याचे सांगत गाडीतून पलायन केले, त्यानंतरच वातावरणातला तणाव निवळला. मात्र भर कडक उन्हात अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने ॲड.दीपक लाड यांना पाठीवर आणि मांडीवर छातीवर भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत.