

विटा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या ‘सुपर स्वच्छ लीग’ विशेष श्रेणीत विटा पालिकेने यश मिळविले आहे. त्यामुळे आता येत्या 17 जुलै 2025 रोजी विटा शहराचा गौरव विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली. देशांतर्गत स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 चे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात विटा पालिकेने सुपर स्वच्छ लीग श्रेणीत पुन्हा एकदा देदीप्यमान यश संपादन केले आहे.
कचरामुक्त शहर, हगणदारीमुक्त शहर यांसारख्या विविध घटकांमध्ये विटा शहराने उत्कृष्ट कामगिरी केली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विट्याने देशात स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शहराने केवळ स्वच्छता राखली नाही, तर देशपातळीवर मापदंड बनविला आहे.
सर्व लोकप्रतिनिधी, शहरातील नागरिक, विटा पालिका प्रशासन, अधिकारी, कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण सहकार्य हे मुख्य कारण आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, तत्कालीन जिल्हा सहआयुक्त चंद्रकांत खोसे, विद्यमान जिल्हा सहआयुक्त दत्तात्रय लांघी, प्रशासक विक्रमसिंह बांदल, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांच्या नेतृत्वाखाली विटा पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांचा या यशात समावेश आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून विटा पालिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’ ही एक नवी आणि महत्त्वपूर्ण श्रेणी समाविष्ट करण्यात आली होती. मागील तीन म्हणजे सन 2021, 2022, 2023 या सलग तीन वर्षांत स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणार्या निवडक शहरांसाठी ही श्रेणी सुरू करण्यात आली. या ‘लीग’मध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी किमान 85 टक्के गुण मिळणे आवश्यक होते. विटा शहराने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपले स्थान बळकट केले.