

सांगली : सांगलीतील हॉटेल अनुयश येथे १० नोव्हेंबर रोजी जेवणासाठी आलेले विजय वसंत पाटील (वय ३६, रा. अमर चौक, धनगर गल्ली, सांगली) यांना हॉटेलमालकाशी झालेल्या वादानंतर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या सख्ख्या भावांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस नाईक सुशील भीमराव सरगर (बक्कल नंबर २८२५, कळंबोली वाहतूक शाखा) आणि पोलिस नाईक सुमित भीमराव सरगर (बक्कल नंबर २७१६, नवीन पनवेल वाहतूक शाखा) अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, हॉटेल अनुयश येथे जेवणासाठी गेलेल्या विजय पाटील यांचा हॉटेलमालक हरिदास पाटील यांच्याशी काही कारणावरून वाद झाला. या वादाच्या कारणावरून पोलिस नाईक सुशील सरगर व सुमित सरगर या दोन सख्ख्या भावांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने विजय पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत भिंतीवर व लोखंडी शटरवर आपटून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृत विजय पाटील यांचे भाऊ विशाल वसंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिस ठाण्यात या दोघांसह अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याबाबत सांगलीच्या पोलिस अधीक्षकांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाला पत्राद्वारे माहिती कळवली होती. दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, गैरशिस्त वर्तन हे पोलिस खात्याच्या नियमास बाधा आणणारे आहे. त्यामुळे त्यांना सेवेत ठेवणे लोकहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असा ठपका ठेवत नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दोघांना सेवेतून निलंबित केले. निलंबन कालावधीत दोघांनाही नवी मुंबई पोलिस मुख्यालयात हजेरी लावणे आणि परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.