

Shaktipeeth highway land acquisition protest
कवठेमहांकाळ : तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथे नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बाधीत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रोखले. गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मोजणी थांबवली. पुन्हा मोजणीला आलात, तर शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीतर्फे दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. तिसंगी गावातील बाधीत शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच ते सहा वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले आहे. प्रखर विरोध करीत त्यांनी एका गटातही मोजणी होऊ दिली नाही. आज पुन्हा मोजणीसाठी आलेल्या पथकास गावकऱ्यांनी एकत्र येत विरोध दर्शविला आणि मोजणी पथकाला परत जावे लागले.
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात असताना त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग करण्याची गरज काय आहे हजारो एकर बागायत शेती उद्ध्वस्त करून शासन कुणाचा विकास करणार आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. आमच्या पिढ्यान्पिढ्या जपलेल्या शेतीवर सरकार विकासाच्या नावाखाली गदा आणत आहे. आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असे शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितले.
पूर्वी झालेल्या पंचनाम्यात सर्व बाधीत शेतकऱ्यांनी मोजणीस नकार दर्शविला होता. त्या वेळी तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून अधिकाऱ्यांनी पुन्हा मोजणीसाठी येणार नाही असे सांगितले होते. तरीदेखील पुन्हा पुन्हा मोजणीसाठी येऊन शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात या घटनेमुळे गावात तीव्र असंतोष पसरला असून प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला जात आहे.
मोजणीसाठी आलेल्या पथकासोबत मोठा पोलिस बंदोबस्त होता. तरीदेखील संतप्त शेतकऱ्यांनी वावरात कोणालाही प्रवेश दिला नाही. प्रशासनाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इथून पुढे तिसंगी गावात शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आलात तर शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील. शेतकऱ्यांनी घोषणा दिली या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष भाई दिगंबर कांबळे, वामन कदम, शिवाजी शिंदे, जगदीश पोळ, नागेश कोरे, सौरभ कदम, रत्नाकर वठारे, सुरेश कुंभार, दादा कुंभार, शिवाजी भोसले, संग्राम शिंदे, सागर शिंदे, प्रवीण कोळी, संपत कोळी, बाळू कोळी, शिवाजी कोळी, बाजीराव जाधव, बाळू कदम, दिलीप डुबुले, उल्हास पाटील, शंकर सुतार, किशोर खराडे, अविनाश खराडे, नागेश शिंदे, मनोज जाधव, सुशीला जाधव यांच्यासह तिसंगी गावातील सर्व बाधीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या जमिनीवर पुन्हा मोजणीसाठी पाऊल ठेवू नका. आधीच पंचनाम्यात आम्ही नकार दिला आहे. पुन्हा मोजणीला आलात तर शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील. शासनाने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.
- वामन कदम, शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती, तिसंगी