

सोनी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकताच सांगली जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. उसाला प्रतिटन ३५०० रुपयांचा दर परवडणारा नसल्याची भूमिका घेत, नुकसान सोसण्यापेक्षा ऊस शेतात वाळला तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यांत रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली. भोसे (ता. मिरज) येथील भोसे फाटा परिसरात १०० हून अधिक ट्रॅक्टर-ट्रॉलींची चाके जागीच थांबल्याने साखर कारखानदारांसमोर पेच निर्माण झाला असून, वाहतूकदारांचीही मोठी तारांबळ उडाली आहे. 'घामाचा हिशेब झाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही,' असा इशारा देत पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन ४,५०० रुपये मिळेपर्यंत एकही वाहन पुढे जाऊ देणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
दरम्यान, महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहने बाजूला करण्याचे प्रयत्न केले. मात्र, प्रवासी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सौरभ शेट्टी यांच्या मध्यस्थीने सर्व वाहने भोसे फाटा येथील एम. डी. जाधव विद्यालयाच्या मैदानात उभी करण्यात आली.
खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील साखर कारखानदारांशी संपर्क साधून आहेत. सांगली जिल्ह्यात सौरभ शेट्टी यांच्यासह युवक आघाडीचे शिष्टमंडळ कारखाना प्रशासनासोबत बैठका घेत आहे. उसाचा अधिकृत दर जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांनी परस्पर ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.