

जत : लोहगाव (ता. जत) येथे शेतजमिनीच्या सरबांधावरील रस्त्याच्या वादातून झालेल्या वादात महिलेसह तिच्या पतीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लोहगाव येथील आठजणांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद संबंधित महिलेने जत पोलिसात दिली आहे.
याप्रकरणी संदीप लालासाहेब काशीद, अच्युतराव कृष्णा काशीद, लालासाहेब कृष्णा काशीद, युवराज लालासाहेब काशीद, हरी पितांबर काशीद, पोपट सुभाष काशीद, सागर दत्तात्रय चव्हाण, सिध्देश्वर भीमराव गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील फिर्यादी महिला व तिचे पती हे दि. 25 नोव्हेंबररोजी सकाळी 8.20 वाजता त्यांच्या गट नं. 782 मधील शेतात गवत काढण्यासाठी गेले होते. यावेळी शेजारील गट क्रमांक 781 मधील काही लोकांनी शिवीगाळ करत वादावादी सुरू केली.
त्यांनी तहसीलदारांनी दिलेला निकाल दाखवून समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून संशयितांनी भांडण सुरू केले. यावेळी संबंधित महिलेच्या पतीस काठीने मारहाण करण्यात आली, तसेच दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर दोघांना उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जत पोलिस करत आहेत.