

विटा : साखर कारखान्याकडून साखर पुरवठा करण्या चे आमिष दाखवून आणि बनावट ई-वे बिले व जीएसटी बिलांचा वापर करून व्यापाऱ्याची ९ कोटी १६ लाख २५ हजार ९९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आशिष आनंदराव पाटील यांच्या फिर्यादीवरून तासगाव तालुक्यातील दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे (दोघेही रा. बिरणवाडी) अक्षय अनिल पाटील (रा.वायफळे), पलूस तालुक्यातील अभिजीत हनुमंत माने (रा.धन गाव) या चौघांसह आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर (ता. माढा,सोलापूर) चे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय ?
विट्यात आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची भागीदारी असलेली 'अन्नपूर्णा ट्रेडिंग' नावाची कंपनी आहे, त्यांनी डिसेंबर २०२१ पासून साखर खरेदी- विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्ण रत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन आणि फार्मड्रीम ॲग्रो सोल्युशन्स प्रा. लि. या कंपन्यांशी व्यवहार केले होते. दीपक मोरे, राजीव मोरे आणि अक्षय पाटील यांनी आशिष पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर (ता.माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून टेंडर दरापेक्षा स्वस्त दरात साखर मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या आमिषाला बळी पडून आशिष पाटील यांनी वेळोवेळी बँक खात्याद्वारे मोठी रक्कम या तिघांच्या खात्यावर जमा केली. मात्र साखर पुरवठा न करता कारखान्याशी संगनमत करून बनावट ई-वे बिले आणि जीएसटी बिले तयार केली. प्रत्यक्षात साखर न देता कागदोपत्री साखर पुरवल्याचे दाखवून आशिष पाटील यांची मोठी आर्थिक फसवणूक केली. तसेच, फसवणुकीची रक्कम परत करण्याबाबत अनेकदा करार पत्रे व प्रोमिसरी नोट लिहून दिले. यानंतर या चौघांनी दिलेले त्या रकमेचे धनादेश बँकेत टाकले असता ते बाऊन्स झाले.
जेव्हा आशिष पाटील यांनी धनादेश बाऊन्स झाल्या बाबत त्यांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी आशिष पाटील यांना खोट्या अॅट्रॉसिटी आणि खंडणी च्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यावरून दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे, अक्षय अनिल पाटील, अभिजीत हनुमंत माने आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर (ता. माढा) चे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१,५०६ आणि ३४ नुसार बनावट कागदपत्रे तयार करून संगणमत करून फसवणूक करणे, विश्वासात करणे, धमकावणे इत्यादी प्रकार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या प्रकर णाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित रामदास काळे करत आहेत.