

अंजर अथणीकर
या वर्षात सांगली जिल्ह्यातील एसटी आगारांना शंभर नव्याकोऱ्या बसेस मिळाल्या. मात्र याचवर्षी जवळपास सव्वाशे बसेस भंगारात काढव्या लागल्या. लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या बसेसचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असला तरी, बसेसचा तुटवाडा मात्र कायम आहे.
गेल्या सात वर्षांनंतर सांगली आगाराला शंभर नव्या बसेस वर्षभरात टप्प्या-टप्प्याने मिळाल्या. सांगली परिवहन महामंडळाला गेल्या दोन वर्षात जवळपास दोनशेहून अधिक बसेस भंगारात काढाव्या लागल्या आहेत. यामुळे सुमारे अडीचशे बसेसची कमतरता आहे. काही बसेस नादुरुस्त असल्यामुळे लांब पल्ल्याच्या सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
नव्या अत्याधुनिक बसेस या 41 सीटच्या असून, यामध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. यामध्ये रिव्हर्स कॅमेरा आहे. ॲटोमेटिक डोअर सिस्टिम आहे. अग्निविरोधी सुविधाही यामध्ये आहेत. पुश बकेट सीट (आरामदायी सीट), प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच आरामदायी बसेस मिळाल्या आहेत. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आदी लांब पल्ल्याच्या सेवेचे प्रश्न मिटला आहे.
शंभर नव्याकोऱ्या बसेस मिळाल्या असल्या तरी, वर्षभरात सव्वाशे बसेस भंगारातही काढव्या लागल्या आहेत. यामुळे प्रश्न जैसे थे राहिला आहे. शहरी बसची सेवा तर वर्षभरात विस्कटली आहे. त्यामुळे वडापच्या व्यवसायाने जोर धरला आहे. जवळपास वर्ष उलटले तरी महापालिकेकडून ई बससेवा सुरू झालेली नाही. यामुळे शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार, तसेच शहर परिसरात राहणाऱ्या प्रवाशांची कसरत सुरू आहे. यावर्षी आषाढी एकादशी, रक्षाबंधन, यात्रा, सहेली, दिवाळीनिमित्त एसटीने चांगला व्यवसाय केला आहे. सांगली आगाराचे काँक्रिटीकरण झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.
(समाप्त)