

मळणगाव : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत रविवारी दुपारी कर्नाटक आगाराच्या बसला भीषण अपघात झाला. महामार्गावरून डांबर वाहतूक करणाऱ्या कंटेनरला धडकून बस रस्त्यालगत असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळली. अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून बसमधील 25 प्रवासी जखमी झाले.
कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस (क्रमांक केए 33 एफ 0559) ही यादगीर येथून विजापूर-जत-विटा-कराड-सातारामार्गे प्रवास करत होती. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बस घाटनांद्रे हद्दीत आली असता भिवघाटवरून घाटनांद्रेकडे डांबर वाहतूक करणारा कंटेनर (क्र. एमएच 02 जीएच 6978) आणि बसची जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसचा ताबा सुटून बस डाव्या बाजूला असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळत विजेच्या खांबाला जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले. बसचालक गंभीर जखमी झाला. अनेक प्रवाशांना हात, पाय, डोके आणि अंगावर गंभीर दुखापती झाल्या. प्रवाशांना तातडीने विटा, सांगोला तसेच आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये संगीता उत्तम पवार (वय 40), कावेरी अनंत वाघमारे (जवळा, ता. सांगोला), रमजान वालीकार (वय 60, इंडी, कर्नाटक), आलिया बागवान (वय 13), साबीर बागवान (वय 40, कराड), दुर्गाप्रसाद प्रधान (वय 30, झारखंड), देवकी कोळी, शंकर दोडमणी, महेश माळी, मल्लाप्पा कोळी, रंजना आकाश कांबळे (वय 25, विजापूर), तेजस्वी ओंकार कांबळे (सांबरा, कर्नाटक), निर्मला मुकेश कांबळे, जहांगीर सिकंदर मकानदार (विजापूर) यांचा समावेश आहे. जखमींपैकी बहुतांश प्रवासी कर्नाटकमधील आहेत.
अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. यावेळी घाटनांद्रेचे पोलिस पाटील एकनाथ शिंदे, अभय चव्हाण, महेंद्र जाधव, सुनील जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली. दरम्यान, अपघातामुळे काही काळ विजापूर-गुहागर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली. अधिक तपास सुरू आहे.