

बंगळूर : ख्रिसमसच्या सुटीनिमित्त बंगळूरहून गोकर्णला स्लीपर बसने परतणार्या प्रवाशांवर गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता चित्रदुर्गजवळ काळ बनून आलेल्या ट्रकने घाला घातला. विरुद्ध दिशेने धावणार्या या ट्रकने दुभाजक ओलांडून कुंपण तोडून सी बर्ड कंपनीच्या खासगी स्लीपर बसला धडक दिली. धडकेमुळे बसच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 10 प्रवाशांचे सजीव दहन झाले. त्यात एक आई-मुलगीचा समावेश आहे. अपघातात बसचे चालक, वाहक बचावले. मात्र ट्रकचालकाचाही होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, 48 मुलांना बंगळूरहून दांडेलीकडे घेऊन जाणारी एक शालेय बस या ट्रकच्या धडकेतून बालंबाल बचावली. अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता. अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यंत्री सिद्धरामय्या यांनी शोक व्यक्त केला असून, मृत तसेच जखमींना मदत जाहीर केली आहे.
अपघातानंतर बंगळूर-बेळगाव महामार्ग सुमारे 3 तास बंद होता. अपघातस्थळापासून दोन्ही बाजूंना 30 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयूर तालुक्यातील गोर्लतु क्रॉसजवळ हा भीषण अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसमध्ये एकूण 32 प्रवासी होती. त्यापैकी काही किरकोळ, तर काही गंभीर जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी प्रवाशांना बंगळूर येथील व्हिक्टोरिया रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसमधून एकूण 32 प्रवासी प्रवास करत होते. 16 महिला व 14 पुरुष तसेच वाहक, चालक यांचा त्यात समावेश आहे. गोकर्णचे 25, कुमठा येथील 2 व शिवमोगा येथील 2 प्रवासी होते. मंजुनाथ, संध्या, शशांक, दिलीप, प्रीतीश्वरन, व्ही. बिंदू, के. कविता, अनिरुद्ध बॅनर्जी, अमृता, ईशा, सूरज, मनसा, मिलन, हेमराजुमर, कल्पना प्रजापती, एम. शशिकांत, विजय भंडारी, नव्या, अभिषेक, एच. किरण पाल, एम. कीर्तन अशी काही प्रवाशांची नावे आहेत. मात्र मृतदेहांचा कोळसा झाल्याने रात्री उशिरापर्यंत मृतांची ओखळ पटली नव्हती. आरक्षण यादीनुसार जिवंत असलेल्या प्रवाशांची खातरजमा केली जात होती. स्लीपर बस बंगळूरहून गोकर्णकडे जात होती. तर कंटेनर ट्रक हिरीयुरहून बंगळूरकडे जात होता. बसचालक, कंडक्टर व इतर काही प्रवाशांनी आगीची घटना घडताच बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. लॉरीचालक कुलदीपचा मृत्यू झाला.
अपघातानंतर आयजीपी रविकांतेगौडा घटनास्थळी दाखल झाले. ते म्हणाले, लॉरी चालकासह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींना शिरा व हिरियूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी असलेल्यांना रुग्णवाहिकेने बंगळूर येथील व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच मृतांची ओळख पटवण्यासाठी बंगळरहून डीएनए व एसयूसीओ पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
चित्रदुर्गचे एसपी रणजीत म्हणाले, बसमधील 21 प्रवाशांची ओळख पटली आहे. अद्याप 11 जणांची ओळख पटवणे बाकी आहे. लॉरीचालक झोपेत असल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.
पंतप्रधानांना शोक
चित्रदुर्ग दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. सोशल मीडियावरील संदेशात मोदींनी म्हटले आहे की, कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. त्यांच्या प्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपये भरपाई दिली जाईल. तर जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये व जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
21 जणांवर उपचार
आगीमुळे जखमी झालेल्या 12 जणांवर हिरीयुरू दवाखान्यात तर 9 जणांवर शिरा दवाखान्यात व तिघांवर तुमकुर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. एका प्रवाशाला बेंगलोर येथील विक्टोरिया दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मृतांची डीएनए तपासणी केली जात असून त्यानंतर ओळख पटल्यानंतर मृतदेहांचे हस्तांतरण केले जाईल.
30 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम :
भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर सुमारे 30 किलोमीटर पर्यंत लांब ट्रॅफिक जाम झाले. मुंबईला जोडणार्या या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा उभ्या होत्या. आग विझवण्याचे काम व आगीत भस्मसात झालेल्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम तातडीने राबवून अपघात झालेले वाहन बाजूला काढून पहाटे पाच वाजता रहदारी सुरळीत करण्यात आली.
दोन अभियंत्या मुली बेपत्ता
अपघातानंतर नव्या आणि मानसी (रा. चन्नरायपटना) या दोन अभियंत्या तरुणी सापडलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मृतांमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. त्या बंगळूर येथे सॉफ्टवेअर अभियंत्या म्हणून कार्यरत होत्या.
48 मुले बालंबाल बचावली
अपघात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असला, तरी 48 लहान मुले बालंबाल बचावली आहेत. ही मुले स्कूल बसमधून बंगळूरहून दांडेलीला जात होती. त्या बसचा चालक म्हणाला, विरुद्ध बाजूने येणारा तो ट्रक दुभाजकावरून उडाला. त्याने आधी आमच्या बसला हलकीशी धडक दिली. त्यानंतर आमच्या मागे असलेल्या सीबर्ड स्लीपर बसनेही आम्हाला धडक दिली. त्याचवेळी ट्रकने स्लीपर बसला धडक दिली. क्षणार्धात आम्हाला लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ आल्या. माझ्या बसमध्ये 48 मुले होती. कुणालाही काहीच झाले नाही. आम्ही बस थांबवली आणि स्लीपर बसमधील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना आम्ही बाहेरही काढले. पण त्यानंतर स्फोट (बहुधा बसच्या डिझेल टाकीचा) झाला आणि आग भडकली. त्यानंतर आम्हाला काहीच करता आले नाही.