

सांगली : शहरांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्र, राज्य शासन प्रयत्नशील आहे. सांगली शहरानेही विकासाची गती वाढविल्यास त्याचा सांगलीकरांना निश्चित लाभ होईल, असे मत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
आयसीएआय आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने रिअल इस्टेट कायद्यांवर चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी आयसीएआय कौन्सिल मेंबर उमेश शर्मा, क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, महाराष्ट्र वीज कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष सुनील कोकितकर उपस्थित होते.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींचे निराकरण करण्याचा सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व महापालिकांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी शासकीय योजनांतून घरे बांधताना ते दर्जेदारच बांधणे अत्यावश्यक आहे.
प्रफुल्ल तावरे म्हणाले, मोठ्या शहरांसाठी तयार करण्यात आलेले कायदे छोट्या शहरांना जाचक आहेत. उमेश शर्मा, आयुक्त संजीता महापात्र यांची भाषणे झाली. याप्रसंगी सुनील कोकितकर यांनी स्वागत केले. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार नीलेश पाटील यांनी मानले.