

शिराळा शहर : शिराळा शहराची ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊन नऊ वर्षे झाली. परंतु अनेक प्रश्न जैसे थे आहेत. अरुंद रस्ते, रस्त्याकडेला बेशिस्तपणे लावलेली वाहने तसेच अनेक छोट्या-मोठ्या टपऱ्या यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. शिराळा बस स्थानक ते ग्लुकोज ऑफिसपर्यंत वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. नगरपंचायत अथवा पोलिस ठाण्याकडून जुजबी कारवाई केली जाते, परंतु हा प्रश्न जैसे थे आहे.
शिराळा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. 20 ते 25 उपनगरे असून तिथेही सुविधा अजून पोहोचलेल्या नाहीत. बाह्यवळण रस्त्यावर सायंकाळी ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण असते. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडा-पाव, चायनीज, आईस्क्रिमच्या गाड्या आणि पान टपऱ्या आहेत. तिथं कुणाचाही अंकुश नाही. वाहने इतस्ततः लावलेली असतात. अनेक अपघात तिथे घडले असून प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. वाहतूक पोलिस तिथे कधीच दिसत नाहीत. लक्ष्मी चौकात असणाऱ्या बाजारामुळे आणि वेगवेगळ्या स्टॉल्समुळे सामान्य जनतेला खूप त्रास होत आहे. नगरपंचायत ठोस उपाययोजना करण्यात असमर्थ आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. शहराला बकाल स्वरूप येण्याआधी, होणाऱ्या कारभाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.