

Sangli Vita Women Morcha
विटा : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा लढा आता अधिक तीव्र होत असून या आंदोलनात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. "शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे", "जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची" अशा घोषणांनी विटा शहर दणाणून सोडत शेकडो महिलांनी हातात लाटणी घेऊन सोमवारी मोर्चा काढला.
खानापूर तालुक्यातील विविध गावांतील महिला आणि शेतकरी सकाळी साडेअकराच्या सुमारास विटा शहरात एकत्र आले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. "एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द" अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
मोर्चा शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या आवारात पोहोचल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे संघटक ॲड. सुभाष पाटील यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असून शक्तीपीठ महामार्ग हा त्याच धोरणाचा भाग आहे. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी निधी उपलब्ध नसताना शक्तीपीठ प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बी. जी. पाटील यांनी सांगली-सातारा जिल्हा हा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वारसा जपणारा प्रदेश असल्याचे सांगत त्याच लढाऊ पद्धतीने शक्तीपीठविरोधी आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली.
काँग्रेसचे नेते गजानन सुतार म्हणाले, "आज महिला लाटणी घेऊन आंदोलनात उतरल्या आहेत. गरज पडल्यास सरकारविरोधात अधिक तीव्र संघर्ष करण्यासही आम्ही मागे हटणार नाही. शक्तीपीठ रद्द होईपर्यंत हा लढा सुरू राहील."
कॉम्रेड उमेश देशमुख यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून नैसर्गिक साधनसंपत्तीवरही परिणाम होईल, असा इशारा दिला. "शक्तीपीठ हा शेतकऱ्यांना शक्तीहीन करण्याचा प्रयत्न असून तो हाणून पाडला पाहिजे," असे ते म्हणाले.
मोर्चात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, गजानन सुतार, उमेश देशमुख, सुष्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महेश कुपाडे, प्रतिभा काटकर, संग्राम देशमुख, ॲड. नानासाहेब पाटील, सुवर्णा पाटील, सुरेखा जाधव, नयना पाटील, श्रीदास होनमाने, जयराम जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.